Knife Attack : पाथर्डी : शहरातील वीर सावरकर मैदान परिसरात गुरुवारी (ता.७) दुपारी आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर (Student) त्याच्याच वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी चाकू हल्ला (Knife Attack) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे पालक (Parents) वर्गामध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
नक्की वाचा : शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या आरोपीवर हल्ल्याचा प्रयत्न
उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल
वेदांत दत्तात्रय कुलट (वय १४, रा. आष्टावाडा, पाथर्डी) असे गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, त्याला पाठीवर धारदार चाकूने गंभीर इजा झाली आहे. प्राथमिक उपचार पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले असून, पुढील उपचारासाठी त्याला अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अवश्य वाचा : आमच्या विरोधात ‘व्होट जिहाद’चा प्रयोग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप
किरकोळ वादातून मित्राने केला चाकूने हल्ला (Knife Attack)
वेदांत कुलट हा शहरातील एका महाविद्यालयात आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गुरुवारी परीक्षा असल्याने तो दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शाळेतून घरी आला होता. त्यानंतर खासगी कामानिमित्त तो दुचाकीवरून शहरातील वीर सावरकर मैदान परिसरात गेला. याच दरम्यान त्याच्याच वर्गातील दोन मित्रांनी त्याला गाठले. किरकोळ वादातून एका मित्राने त्याच्यावर चाकूने हल्ला केला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. हल्ला झाल्यानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
स्थानिकांनी वेदांतला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, पोलीस कॉन्स्टेबल निलेश गुंड व संजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस अधिक तपास करत असून, दोन्ही संशयित विद्यार्थ्यांच्या शोधासाठी पोलीस ठिकाणी गेले आहेत. शालेय वयातील मुलांच्या हातात चाकू कसा पोहोचतो, याबाबत समाजातही चिंतेची भावना व्यक्त होत आहे.