Kopargoan | शेतकऱ्यांच्या बांधावरच न्याय निवाड्याचा कोपरगाव पॅटर्न; ७५ वाद बांधावरच निकाली

0

Kopargoan | कोपरगाव : महाराष्ट्र (Maharashtra) सरकारने महाराज्य अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना बांधापर्यंत वाहतूक व्हावी यासाठी शिव व पानंद रस्ते खुले करण्याचे शासन आदेश काढले होते. त्यानुसार प्रशासनाकडे शेत-शिवार रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रकरणे दाखल झाली. शिव रस्ता खुला करण्यावरून वाद होते. हे वाद वाढल्याने गावात तनावाची स्थिती निर्माण होऊ लागली. यातून कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी मार्ग काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.  बांधावरच न्यायनिवाडा हा कोपरगाव (Kopargoan) पॅटर्न आता राज्यात चर्चेचा व कौतुकाचा विषय ठरत आहे.   

हेही वाचा – आता गॅस सिलिंडरचा पुरवठा होणार सुरळीत; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

बांधावर जाऊन न्यायनिवाडा

कोपरगाव तालुक्यातील शेत-शिवार रस्त्यांच्या प्रलंबित केसेसवर तहसीलदार महेश सावंत यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन न्यायनिवाडा करण्याची मोहीम हाती घेतली आहे. प्रशासनाच्या या गतिमानतेमुळे आतापर्यंत तब्बल ७५ क्लिष्ट प्रकरणे निकाली निघाली आहेत. ६० किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्ते मोकळे झाले आहेत. नुकतेच हिंगणी येथील पारधी वस्तीचा १४ वर्षांपासून प्रलंबित असलेला वाद सामंजस्याने मिटवून या मोहिमेने आपला यशस्वी ७५ वा टप्पा पूर्ण केला आहे. 

अवश्य वाचा – अहिल्यानगर महापालिकेकडून भाड्याच्या उत्पन्नावर कर आकारणी; क्षेत्रफळानुसार आकारणी करण्याची शिवसेनेची मागणी

अभिनव उपक्रम सुरू

कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र जमिनीचे विभाजन, खरेदी-विक्री व कौटुंबिक वाटणीमुळे दरडोई जमीनधारणा कमी होत आहे. शेत रस्त्यांवरून वारंवार वाद निर्माण होतात. यातून वेळ, श्रम व संसाधनांचा अपव्यय टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार महेश सावंत यांनी हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

७५ वे प्रकरण हिंगणीतील पारधी वस्ती येथील शेतरस्त्याचा हा विवाद २०१० सालापासून प्रलंबित होता. रस्त्याअभावी पारधी वस्तीतील दीडशे लोकांना रहदारीसाठी अत्यंत अडचण होत होती. ज्यातून कित्येकदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे देखील दाखल झाले होते. तहसीलदार महेश सावंत यांनी रात्री ८.४५ वाजेपर्यंत पारधी वस्तीवर थांबून सर्वांना समजावून सांगितले. अखेर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४३ नुसार, बांधावरच न्याय निवाडा करून १० फूट रुंद व १६०० फूट लांबीचा रस्ता सामंजस्यातून उपलब्ध करून दिला. ६९ वे प्रकरण संवत्सर येथील जाधव वस्तीवर रेल्वे विभाग व शेती महामंडळ यांच्या हद्दीमुळे निर्माण झालेला अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न सोडवून तब्बल १८५ एकर शेतीसाठी रस्ता खुला करण्यात आला. ६८ व्या प्रकरणात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४९ अन्वये उक्कडगाव येथील रस्ता व पाईपलाईनचा वाद जागेवरच मिटवून ४ कुटुंबांना दिलासा देण्यात आला. ६७ व्या प्रकरणात ब्राह्मणगाव टाकळी येथील देवकर वस्तीवरील ५ कुटुंबांचा रस्ता प्रश्न मिटवून २७व्यक्तीची वहिवाट सुलभ करण्यात आली.

हे पहा – वडिलांचं स्वप्न मुलीनं केलं पूर्ण; संगमनेरची लेक झाली कलेक्टर!

उपक्रमात या गावांचा समावेश

या उपक्रमांतर्गत तालुक्यातील करंजी, चांदेकसारे, जेऊर कुंभारी, शहाजापूर, शिरसगाव, वेस, ओगदी, पढेगाव, मळेगावथडी, वंदे, धोर्डेवाडी, सांगवी भुसार, कोकमठाण, नाटेगाव, जेऊर पाटोदा, धारणागाव, देर्डे चांदवड, आपेगाव, येसगाव, कोळपेवाडी, कुंभारी, मढी, तिळवणी, गोधेगाव, वारी, काकडी, सोनेवाडी, मल्हारवाडी, देर्डे कोऱ्हाळे, धामोरी, जवळके, तळेगाव मळे, वेळापूर, हंडेवाडी, धोंडेवाडी, सडे, मनेगाव यांसह आता ब्राह्मणगाव टाकळी, उक्कडगाव, संवत्सर व हिंगणी या गावांचा समावेश झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here