Krishna Sonawane : नगर : ‘आपल्या भारत (India) देशातील कोणत्याही कायद्याचा मूळ गाभा राज्य घटनेत आहे. कायदा (Law) हा राज्य घटनेच्या तत्त्वानुसार पारित झालेला असतो. नागरिकांच्या संरक्षणासाठी असणारा कायदा समजून घेण्यासाठी व्यक्तीकडे कॉमन सेन्स अर्थात व्यवहारज्ञान असणे गरजेचे असते,’ असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे (District Legal Services Authority) सचिव तथा न्यायाधीश कृष्णा सोनवणे (Krishna Sonawane) यांनी केले.
नक्की वाचा : आयुष्मान कार्ड योजनेचा कोणत्या रुग्णांना मिळणार फायदा ? जाणून घ्या सविस्तर…
कायदेविषयक जनजागृती कार्यशाळा
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व आडसुळ विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिवस व कायदेविषयक जनजागृती कार्यशाळा आडसुळ कॅम्पस येथील श्री माणिक शंकर आडसुळ सभागृहात उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना न्यायाधीश सोनवणे बोलत होते.
अवश्य वाचा : “शिवसेना आजही आमचा मित्र पक्ष!मात्र”…;देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
यावेळी उपस्थिती (Krishna Sonawane)
याप्रसंगी स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर ॲड. सुभाष भोर, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेचे चेअरमन अनिरुद्ध आडसुळ, संस्थेच्या सचिव लीना आडसुळ, संस्थेचे संचालक कृष्णा आडसुळ, संस्थेच्या आडसुळ टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. प्रदीप पाटील, आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. संभाजी पठारे, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य रियाज बेग, पॉलिटेक्निकचे प्राचार्य रमेश गडाख, प्राचार्य डॉ.प्रदीप पंडित, प्राचार्य डॉ.संदेश वायाळ, प्राचार्य डॉ. धनंजय लांडगे, ॲड. संदीप पाखरे, प्रा. श्रृती हलदार, प्रा. क्रांती बागूल, प्रा. प्रदीप गायकवाड आदी उपस्थित होते.
न्यायाधीश सोनवणे पुढे म्हणाले, ‘कायदा हा प्रत्येक क्षेत्रात लागू होतो. त्यामुळे कायद्याचे ज्ञान आवश्यक आहे. भारतीय संविधानाची उद्देशिका कायद्याचा गाभा आहे. कायद्याचे शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष न्यायालयाला भेट देऊन तेथे कामकाज कसे चालते, याचाही अभ्यास करणे गरजेचे आहे,’ असेही ते म्हणाले. यावेळी न्यायाधीश सोनवणे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कामकाजाबाबत माहिती दिली.
ॲड. सुभाष भोर यांनी ‘नागरिकांचे मूलभूत कर्तव्ये’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘कायद्याचे शिक्षण घेताना खऱ्या अर्थाने भारतीय राज्यघटना समजून घेणे महत्त्वाचे आहे. भारतीय राज्यघटनेतील उद्देशिका केवळ वाचण्यापुरती मर्यादित न ठेवता ती समजून घेऊन आत्मसात करणे महत्त्वाचे आहे,’ असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी लोकन्यायालयाची सुरुवात, महत्त्व यावरही मार्गदर्शन केले.
ॲड. सुरेश लगड यांनी ‘घरगुती महिला हिंसाचार प्रतिबंध कायदा’ यावर विविध उदाहरणे देत मार्गदर्शन केले. ‘महिलांच्या संरक्षणासाठी आपल्या देशामध्ये विविध कायदे आहेत. महिलांनी अन्याय सहन न करता त्याविरुद्ध कायद्याचा आधार घेऊन लढण्याची गरज आहे. छोट्या छोट्या गोष्टींबाबत सावध राहणे आवश्यक आहे,’ असेही ते म्हणाले.
संस्थेचे चेअरमन अनिरुद्ध आडसुळ यांनी ‘आंतरराष्ट्रीय न्याय दिवस’ साजरा करण्यास कशाप्रकारे सुरुवात झाली, याबाबत माहिती दिली. जागतिक पातळीवर दोन देशांमध्ये असणारे वाद मिटवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे कशाप्रकारे उपयुक्त ठरतात, याबाबत देखील त्यांनी माहिती दिली. विधी महाविद्यालयाचे प्राचार्य रियाज बेग यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आडसुळ विधी महाविद्यालयाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी जमदाडे, प्रियंका मुळे-आठरे, वृषाली जाधव, संदीप रोकडे यांनी केले. विशाल नकाते यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आडसुळ विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.