Land Records Office : पाथर्डी : राज्याच्या भूमि अभिलेख कर्मचारी (Land Records Employee) कृती समिती यांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या आंदोलनाची अंमलबजावणी सुरू झाली असून त्याचा थेट परिणाम पाथर्डी येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या (Land Records Office) कामकाजावर दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने असहकार आंदोलन (Non-Cooperation Movement) सुरू केल्याने कार्यालयात शुकशुकाट पसरला असून नागरिकांच्या कामांचा मोठा खोळंबा होत आहे.
नक्की वाचा: सुजय विखे पाटील यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती
सामूहिक रजा, पुणे येथे मोर्चाची घोषणा
आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात दि. १८ फेब्रुवारी रोजी मोजणीसाठी लागणारे साहित्य कार्यालयात जमा करण्यात आले. त्यानंतर दि. २० फेब्रुवारीपर्यंत कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केवळ अत्यावश्यक कार्यालयीन कामकाज करण्याचा निर्णय घेतला. मैदानी स्वरूपाची मोजणी, फेरमोजणी, हद्द निश्चिती यांसारखी कामे पूर्णपणे थांबविण्यात आली. त्यामुळे शेती जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://whatsapp.com/channel/0029VbCCtgJ4IBhMHvG2cG3D
नागरिकांच्या कामांचा मोठा खोळंबा (Land Records Office)
आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात दि. २३ ते २६ फेब्रुवारीदरम्यान सामूहिक रजा टाकून असहकार आंदोलन पुकारण्यात आले आहे. या काळात कार्यालयात अत्यल्प कर्मचारी उपस्थित असल्याने विविध कामे रखडली आहेत. सातबारा उतारे, फेरफार नोंदी, नकाशे, मालमत्ता व्यवहारांसाठी लागणारी कागदपत्रे यांसाठी नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागत आहेत.
पाथर्डी तालुका शेतीप्रधान असल्याने भूमी अभिलेख कार्यालयाशी नागरिकांचा थेट संबंध येतो. जमीन खरेदी-विक्री, बँक कर्ज, वारस नोंदी, सीमारेषा वाद, बांधकाम परवानग्या यांसारखी अनेक कामे या कार्यालयावर अवलंबून असतात. आधीच मोजणी प्रक्रियेला विलंब होत असल्याच्या तक्रारी असताना आंदोलनामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.

कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलनासंदर्भातील सूचनाफलक लावण्यात आला असून कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असून कामकाज बंद आहे असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना परत जावे लागत आहे. काही नागरिकांनी शासनाने तातडीने मध्यस्थी करून तोडगा काढावा, अशी मागणी व्यक्त केली आहे.
दरम्यान, आंदोलनाचा पुढील टप्पा अधिक तीव्र स्वरूपाचा असणार आहे. दि. २७ फेब्रुवारी रोजी पुणे येथे जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) यांच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यभरातील कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.
उपरोक्त मागण्या मान्य न झाल्यास दि. २ मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलन (संप) करण्यात येईल, असा इशारा कर्मचारी कृती समितीने दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत भूमी अभिलेख विभागातील कामकाज पूर्णतः ठप्प होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



