Laxman Hake : राज्यातील निवडणुकानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) केंद्रात तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे राज्यात मंत्री दिसतील. पुण्यात अजित पवार (Ajit Pawar)वरचढ ठरतील. पहाटे फिरून मोकळे भूखंड पुन्हा हडप करतील,असं म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाके (lakshman Hake) यांनी पवार कुटुंबावर तोफ डागली आहे. दोन्ही पवार कधीच वेगळे नव्हते हे माझे सांगणे राज्याला दिसून येईल,असा दावा हाके यांनी केला आहे.
नक्की वाचा: काँग्रेस अन् एमआयएमसोबत युती खपवून घेणार नाही;देवेंद्र फडणवीसांचा इशारा
“अजित पवार मोकळे भूखंड शोधतील आणि पाचशे रुपयात बळकावतील” (Laxman Hake)
पुण्यात फुले, शाहू,आंबेडकरांचे नाव आणि तिकीट बोडके,आंदेकर, नायर यांना देणाऱ्या अजित पवारांची बाजू सध्या वरचढ असल्याचा अंदाजही ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. पुण्यात सत्ता आल्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार पहाटे बाहेर पडतील, मोकळे भूखंड शोधतील आणि पाचशे रुपयात बळकावतील, असा गंभीर आरोपही हाके यांनी केला आहे. यावेळी पवार कुटुंबावर टीका करताना पवार यांना सर्वसामान्य जनतेचे काही पडले नसून ते उद्योजक असल्याचा आरोप हाके यांनी केला आहे. जरी शरद पवार भाजपसोबत जायचे नसल्याबाबत वक्तव्य करीत असले तरी त्यांचे खायचे दात वेगळे आणि पोटातले दात वेगळे आहेत. ते राज्यातील भाजपला किंमतच देत नाहीत. तर थेट मोदी आणि शाह यांच्या संपर्कात असतात असा टोला लक्ष्मण हाकेंनी शरद पवारांना लगावला आहे.
अवश्य वाचा: ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ सिनेमात ‘हा’ अभिनेता साकारणार शिवरायांची भूमिका
अजित पवार हे भ्रष्टाचाराचे महामेरू – लक्ष्मण हाके (Laxman Hake)
अजित पवार हे भ्रष्टाचाराचे महामेरू आहेत. भाजप स्वतःला पवित्र गंगा मानत असला तरी त्यामध्ये ही भ्रष्ट गटारगंगा मिसळून घेतल्याने सर्वसामान्य भाजप कार्यकर्ताही पक्षावर नाराज असल्याचे हाके यांनी सांगितले आहे. या पवारांना दूर ठेवण्यासाठी जनतेने भाजपला सत्तेवर बसवले आणि पुन्हा भाजपने याच भ्रष्ट पवारांना सत्तेत सहभागी करून घेतले, अशी टीका हाके यांनी केली.



