तब्बल साडेतीन तासांनंतर बिबट्याला पकडण्यात वनविभाग यशस्वी
Leopard : संगमनेर : संगमनेर शहरातील (Sangamner City) नाशिक पुणे राज्यमार्गावरील (Nashik Pune State Road) मालपाणी लॉन्सच्या आवारात फेरफटका मारुन, तो मालदाड रोडवरील आदर्श कॉलनी परिसरातील एका बैठ्या घराच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बिबट्या (Leopard) घुसल्याने, त्या घरातील रहिवासी व परिसरातील नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.
नक्की वाचा : मराठा आरक्षणाच्या आड येणारांना गुलाल लागू देणार नाही : मनोज जरांगे
गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहरा परिसरात एका बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे अनेकांनी पाहिले होते. निवांतपणे भक्ष्यावर ताव मारणारा बिबट्या पाहून अनेकांची पाचावर धारण बसली होती. या परिसरातील झाडी तोडून टाकल्याने त्याचा नैसर्गिक अधिवास संकटात आल्याने तो तेथून इतरत्र स्थलांतरीत झाल्याने, भल्या सकाळीच बिबट्याच्या थेट मानवी वस्तीतील घरात झालेल्या शिरकाव्यामुळे पुन्हा एकदा संगमनेरकरांची धावपळ उडाली.
अवश्य वाचा : प्रवासात सुट्ट्या पैशांची चिंता मिटली; प्रवाशांच्या सेवेत डिजिटल तिकीट
अजिंक्य उपासनी या युवकाने तातडीने वनविभागाला माहिती दिल्याने संगमनेर भाग २ चे वनक्षेत्रपाल सागर केदार यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू ऑपरेशनसाठी रॅपिड रिस्पॉन्स टीम सज्ज झाली. या टीममधील वनविभागाचे वनरक्षक संतोष पारधी, रविंद्र पडोळे, संतोष बोऱ्हाडे, दिपक शिरतार, नवनाथ व विलास गोफणे तसेच वनपाल देवीदास जाधव, सुहास उपासनी, रमेश पवार, वनरक्षक विठ्ठलसिंग जारवाल, गजानन पवार, हरिश्चंद्र जोजार, रामकृष्ण सांगळे, श्री. धानापुणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
सुकेवाडी पावबाकी कडून भक्ष्याच्या शोधात भरकटलेला बिबट्या सकाळी सातच्या सुमारास थेट मालपाणी लॉन्सच्या आवारात घुसला. मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केल्याने तेथून बाहेर पडून त्याने मागिल बाजूने मालदाड रोडवरील आदर्श कॉलनी गाठली. दरम्यान दिवस उजाडल्याने रस्त्याच्या कडेला झाडा झुडूपांचा आधार घेत ” तो ” परतीच्या प्रवासाला चालला असताना, या परिसरातील अनेकांनी भल्या सकाळी बिबट्याचे लाईव्ह दर्शन घेतले. तो बिबट्या विलास मच्छिंद्र मानकर यांच्या पत्र्याच्या बैठ्या घराच्या पाठीमागील बाजूला अडगळीचे सामान ठेवण्यासाठी तयार केलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसल्याचे ऋतुजा मानकर यांनी पाहिल्याने घरातील इतरांना सावध करीत तातडीने घराचा दरवाजा बंद करुन घेतला. बिबट्या पाहण्यासाठी कॉलनीतील बंगल्यांच्या छतावर बघ्यांची गर्दी वाढू लागल्याने, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सतिष बुरुंगले व इतर कर्मचारी तसेच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक निवांत जाधव व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून बघ्यांची गर्दी नियंत्रित करण्यास सुरुवात केली.
घटनास्थळी सर्व साहित्यानिशी दाखल झालेल्या वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने शेडला जाळी लावून त्याचा बंदोबस्त करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. “याची देही याची डोळा” बिबट्या पाहण्यासाठी सुरक्षित ठिकाणी महिला, पुरुषांची गर्दी वाढू लागली होती. रेस्क्यू करताना चवताळलेला बिबट्या चुकून सुटल्यास समोर दिसेल त्याला गंभीर इजा करण्याची दाट शक्यता असल्याने, पोलिस व वनविभागाचे कर्मचारी गर्दीला दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. हाती मोबाईल घेतलेल्या प्रेक्षकांचे अनेक डोळे या सर्व घटनाक्रमाकडे लक्ष ठेवून होते.
अखेर शर्थीच्या प्रयत्नांनतर पावणे बाराच्या सुमारास बिबट्याला पकडण्यात यश आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
पकडलेला बिबट्या संगमनेर खुर्दच्या वनरोपवाटिकेत आयसोलेशनसाठी काही काळ ठेवण्यात आला असून, त्याला कालांतराने त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येणार आहे. हा बिबट्या सुमारे सात ते आठ वर्ष वयाचा पूर्ण वाढ झालेला नर जातीचा असल्याची माहिती वनक्षेत्रपाल सागर केदार यांनी दिली. गेल्या काही वर्षात पिण्याचे पाणी, मुबलक भक्ष व उसाच्या शेतीमुळे सुरक्षित लपण या आदर्श अधिवासामुळे संगमनेर तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढते आहे. अशा परिस्थीतीत आपणच आपली सुरक्षितता बाळगणे अधिक सोयीस्कर ठरणार आहे.