Leopard : जातेगाव परिसरात बिबट्याची दहशत : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Leopard : जातेगाव परिसरात बिबट्याची दहशत : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

0
Leopard : जातेगाव परिसरात बिबट्याची दहशत : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Leopard : जातेगाव परिसरात बिबट्याची दहशत : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Leopard : पारनेर : जातेगाव (ता. पारनेर) परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा (Leopard) वावर वाढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः राळेगण सिद्धी रस्त्यावरील खोमदरा भागात बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी वनविभागाने (Forest Department) तातडीने पिंजरा लावून या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राळेगण सिद्धी (Ralegan-Siddhi) रस्त्यावरील खोमदरा भागात तब्बल तीन बिबटे अनेकदा खेळताना दिसले आहेत. यामुळे या परिसरातील रहिवासी आणि प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली आहे.

नक्की वाचा : “लाडक्या बहिणींना केवायसी करावीच लागेल”- अजित पवार

शालेय विद्यार्थ्यांच्या मार्गावर धोका

हा रस्ता परिसरातील अनेक गावांना जोडणारा एक शॉर्टकट मार्ग आहे. जातेगाव फाटा ते राळेगण सिद्धी मार्गे पिंपळनेर, पारनेर, राळेगण थेरपाळ आणि निघोज या गावांकडे जाणारा हा रस्ता सध्या अतिवर्दळीचा झाला आहे. पळवे, जातेगाव आणि घाणेगाव येथील अनेक विद्यार्थी याच मार्गाचा वापर करून राळेगण सिद्धी येथे शिक्षणासाठी ये-जा करतात. बिबट्यांचा वावर याच मार्गालगत असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. लहान मुले आणि वृद्ध नागरिकही या रस्त्याने सतत प्रवास करत असल्याने भीतीचे प्रमाण अधिक वाढले आहे.

अवश्य वाचा : परदेश शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

बिबट्याचे व्हिडिओ चित्रीकरण (Leopard)

जातेगाव येथील निवृत्त अधिकारी विलास औटी यांनी बिबट्यांच्या वावराला दुजोरा दिला आहे. औटी यांनी मागील महिन्यात चार ते पाच वेळा बिबट्यांना प्रत्यक्ष पाहिले. त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये त्यांचे व्हिडिओ देखील टिपले आहेत. यामुळे बिबट्यांच्या उपस्थितीची माहिती ठोसपणे सिद्ध झाली आहे. विलास औटी यांनी आपली चिंता व्यक्त करताना सांगितले, “दिवसेंदिवस बिबट्यांचा वावर वाढत आहे. सरकारने यावर काहीतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे.”

तातडीने कारवाईची मागणी
बिबट्यांच्या सततच्या वावरामुळे नागरिकांच्या मनात मोठी दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने खोमदरा भागात बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे.वनविभागाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास जिवीतहानी होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे वनविभागाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. याबाबत वनविभागाकडून तातडीने काय पाऊले उचलली जातात, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.