
Leopard : नगर : जिल्ह्यात अलीकडच्या काळात मानव–बिबट संघर्षाच्या (Human-Leopard Conflict) घटना वाढल्या असून, या घटनांना आळा घालण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वय साधून मिशन मोडवर काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी दिले. संवेदनशील भागांमध्ये बेस कॅम्प सुरू करून तेथून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
नक्की वाचा : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मानस : पालकमंत्री विखे
जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंध समिती आढावा बैठक
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंध समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, महावितरणचे अधीक्षक अभियंता पवार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, (Leopard)
काही भागांत बिबट्याच्या हल्ल्यांमुळे मानव आणि पाळीव प्राण्यांचे नुकसान झाले आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी व्यापक जनजागृती अत्यावश्यक आहे. ग्रामपंचायतींमार्फत नागरिकांना बिबट्यापासून सुरक्षित राहण्याबाबत आवश्यक मार्गदर्शन द्यावे. संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांनी गावा-गावांमध्ये बैठका घेऊन जनजागृती कार्यक्रम राबवावेत. राष्ट्रीय स्तरावर संपर्कासाठी १९२६ हा क्रमांक उपलब्ध आहे. जिल्हास्तरावर स्वतंत्र टोलफ्री क्रमांक सुरू करून त्याची व्यापक प्रसिद्धी करावी, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. सध्या दोन प्रशिक्षित रेस्क्यू टीम कार्यरत असून, राहुरी वनपरिक्षेत्रातील बारागाव नांदूर येथे वन्यप्राणी उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. तसेच बिबट्या रेस्क्यू सेंटर स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. याशिवाय प्राथमिक प्रतिसाद दल, एआय आधारित अलार्म प्रणाली, ड्रोन टेहळणी, आरएफआयडी मायक्रोचिप आणि ॲनिमल रिपेलंट यांसारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
जलद कृती दलामार्फत तत्काळ मदत पोहचवा
वन विभागाकडे उपलब्ध असलेले सर्व पिंजरे संवेदनशील भागांत तातडीने बसवावेत. बिबट्याची माहिती मिळताच जलद कृतीदल घटनास्थळी पोहोचून आवश्यक मदत करेल, याची खात्री करावी. बिबट्या प्रवण भागांत रात्रीच्या वेळी अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करावा. तसेच रस्त्यालगतच्या झाडोऱ्या व काटेरी झुडपे हटवून नागरिकांच्या हालचालीसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशा सूचनाही देण्यात आल्या.
कोम्बिंग ऑपरेशन द्वारे बिबट्यांचा बंदोबस्त
वन्यप्राण्यांना पकडण्यासाठी आवश्यक साधनसामग्री आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची काटेकोर व्यवस्था करावी. बिबट्यांना पकडण्यासाठी प्रशिक्षित पथकांमार्फत कोम्बिंग ऑपरेशन राबवावे. गरज पडल्यास बाह्य तज्ञ किंवा इतर यंत्रणांची मदत घ्यावी. वन विभागाला आवश्यकतेनुसार अतिरिक्त पिंजरे, थर्मल ड्रोन, ट्रॅप कॅमेरे, लाँग रेंज टॉर्च आणि रेस्क्यू वाहने उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दिली.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल
बिबट्याचा वावर असलेल्या गावांमध्ये विशेष पथकांमार्फत जनजागृती केली जात आहे. ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे पगमार्क, विष्ठा आणि छायाचित्रांचा दररोज आढावा घेतला जातो. बिबट्याच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कमांड कंट्रोल रूम स्थापन करण्यात आली आहे, असे
उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी सांगितले.


