Leopard : अकोले: “लई वाघ (बिबटे) (Leopard) झालेत. वाघ पोरांना खातो. आम्हाला त्याची भीती वाटते. घरचे आम्हाला बाहेर खेळायला जाऊ देत नाहीत. तुम्ही सगळे वाघ पकडून पिंजऱ्यात टाका म्हणजे मग आम्हाला अंगणात खेळता येईल. लहान पोरांचे जीव जाणार नाहीत…”अशा शब्दांत देवठाण (ता. अकोले) (Akole) शाळेतील भीतीग्रस्त मुलांनी आपल्या भावना वन अधिकाऱ्यांकडे (Forest Officer) व्यक्त केल्या.
अवश्य वाचा : बिबट्याच्या हल्ल्यात खारे कर्जुने येथील पाच वर्षाच्या मुलीचा मृत्यू
योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन
देवठाण परिसरात बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे निर्माण झालेल्या भीतीच्या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषदेच्या शाळेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मुलांशी संवाद साधला. मुलांच्या शंकांचे निरसन करताना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. योग्य खबरदारी घेतल्यास बिबट्याचे हल्ले टाळता येऊ शकतात, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. अलिकडेच बिबट्याच्या हल्ल्यात एका लहान बालकाचा मृत्यू झाल्याने परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण आहे. विशेषतः लहान मुलांच्या मनात बिबट्याबद्दल तीव्र दहशत असून ती या संवादातून प्रकर्षाने जाणवली. या भीतीतून बाहेर काढण्याच्या आणि सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी वनपाल देविदास जाधव, विठ्ठल पारधी, वनरक्षक अंकुश काकडे आणि एकनाथ पारेकर यांनी मुलांशी संवाद साधताना त्यांना समजेल अशा भाषेत सविस्तर उत्तरे दिली.
शाळेतून घरी जाताना गटाने बोलत चालत जावे.
सायंकाळी शाळा सुटल्यानंतर वस्तीवर परतल्यावर एकट्याने बाहेर न पडणे.
कुत्री, मांजरे यांच्या आसपास खेळणे टाळणे.
वस्तीवरून शाळेत येणे-जाणे गटाने करणे.
अंधारात बाहेर पडताना टॉर्च/बॅटरी सोबत ठेवणे.
घराभोवती गिन्नी गवत, ऊस, मका यासारखी झाडीदार पिके न लावणे.
अचानक बिबट्या समोर आला तर दोन्ही हात वर करून स्थिर उभे राहणे आणि पळून न जाणे.

नक्की वाचा : काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाचे पैसे जमा, तर अनेकांना अद्याप प्रतीक्षा
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे विचारले प्रश्न (Leopard)
अशा प्रकारच्या बिबट्याच्या हल्ल्यांपासून संरक्षणाविषयी महत्त्वाच्या सूचना दिल्या. बिबट्याच्या सवयी, भक्ष्य, दैनंदिन जीवनात उपयोगी पडेल असा जीवनोपयोगी धडा या संवादातून मुलांना शिकायला मिळाला. विद्यार्थी आर्या सहाणे, स्वरा सहाणे, दुर्वा शेळके, त्रिष्णा येलमामे, कृष्णा हासे, मेघा जोरवर आदी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मुलांशी साधलेला संवाद मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवणारा ठरला असून, यातून सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल. प्रास्ताविक भाऊसाहेब चासकर यांनी केले तर आभार मारुती बांगर यांनी मानले. धनराज वाकचौरे, शोभा घनदाट, अनिता सुकटे आणि मंगला घोलप उपस्थित होते.



