Leopard : राहुरी : राहुरी खुर्द येथील शिंगणापूर फाटा येथे रविवारी (ता.२४) दुपारच्या दरम्यान वर्दळीच्या ठिकाणी बिबट्या (Leopard) आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुमारे तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला जेरबंद (Imprisoned) करण्यात यश आले. मात्र, या दरम्यान बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वन विभागातील (Forest Department) तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले.
अवश्य वाचा : उज्जैन च्या महाकाल मंदिरात आगीचा भडका;पुजाऱ्यांसह अनेक जण होरपळले
बिबट्या वाहनाची धडक बसून तो जखमी (Leopard)
गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालूक्यातील राहुरी खुर्द परिसरात बिबट्याचा वावर दिसून येत होता. त्या बिबट्याने अनेक कुत्र्यांचा फडशा पाडला होता. शनिवारी (ता.२३) सायंकाळच्या दरम्यान बिबट्या रस्ता पार करत असताना त्याला एका वाहनाची धडक बसून तो जखमी झालेला होता. रात्रीपासून तो बिबट्या शिंगणापूर फाटा येथील विद्यापीठ क्षेत्रात झाडा झुडपात दबा धरुन बसला होता. २४ मार्च रोजी दुपारी बारा वाजेदरम्यान काही लोकांना बिबट्या दिसला. याबाबत त्यांनी प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर उप वन संरक्षक सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीचे सहायक वन संरक्षक गणेश मिसाळ, वन क्षेत्रपाल युवराज पाचरणे, रेस्कु टिम संगमनेरचे संतोष पारदे, वन विभागाचे सतिश जाधव, समाधान चव्हाण, ताराचंद गायकवाड, शंकर खेमनर, राधाकिसन घोडसरे, कैलास रोकडे, लक्ष्मीकांत शेंडगे, वन कर्मचारी गोरख मोरे, पोपट ढोकणे, वनपाल सचिन शहाणे, सुनिल अमोलिक, राहुरी पोलीस पथकातील हवालदार प्रवीण बागुल, नदीम शेख, सचिन ताजने, प्रमोद ढाकणे, सतीश कुऱ्हाडे आदी वन विभाग व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
हेही पहा : एसआयटीच्या चौकशीला मी घाबरत नाही : मनोज जरांगे पाटील
डरकाळ्या फोडत कर्मचाऱ्यांवर हल्ला (Leopard)
बिबट्याला पकडण्यासाठी जाळे लावण्यात आले. नंतर त्याला भूलीचे इंजेक्शन देण्यात आले. या दरम्यान जखमी झालेल्या बिबट्याने प्रचंड अशा डरकाळ्या फोडत कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात वन विभागाचे संतोष परदेशी, ताराचंद गायकवाड, वैभव जाधव हे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर काही वेळाने बिबट्या बेशुद्ध झाला. त्यानंतर वन विभाग कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी परिसरातील तरुणांच्या मदतीने बिबट्याला जाळे टाकून पकडले आणि सायंकाळी सहा वाजे दरम्यान बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले. बिबट्याला पकडण्याचा हा थरार सुमारे तीन ते चार तास सुरु होता. या दरम्यान बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील शेकडो नागरिक घटनास्थळी उपस्थित होते. बिबट्या जेरबंद झाल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.