Leopard cub | संगमनेर: शहरातील उच्चभ्रू आणि गजबजलेली वस्ती मानल्या जाणाऱ्या कुंथुनाथ सोसायटीत आज (ता.१८) सकाळी बिबट्याच्या चार ते पाच महिन्यांच्या पिल्लाने (Leopard cub) थेट घरात शिरकाव केल्याने खळबळ उडाली आहे. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात महिलांची पाचावर धारण बसली असून, नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. वन विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेत युद्धपातळीवर सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
अवश्य वाचा- शेतकऱ्यांसाठी संशोधन अधिक गतिमान करा : कृषीमंत्री भरणे
परिसरात एकच धावपळ उडाली (Leopard cub)
बुधवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ९:३० च्या सुमारास कुंथुनाथ सोसायटीतील सिद्धार्थ ओहरा यांच्या बंगल्यात ही थरारक घटना घडली. ओहरा यांच्या पत्नी घरात पूजा आटोपून बाहेर आल्या असताना, त्यांना अचानक समोर बिबट्याचे पिल्लू दिसले. बंगल्याच्या मागील बाजूला असलेल्या काटवणातून (झाडीतून) या पिल्लाने थेट घरात उडी मारून प्रवेश केला होता. डोळ्यांसमोर बिबट्याचे पिल्लू पाहताच त्यांनी आरडाओरडा केला, ज्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून संगमनेर परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. शेतातील गिनी गवत आणि ऊस काढणी पूर्ण झाल्यामुळे बिबट्यांचे नैसर्गिक लपण्याचे ठिकाण नष्ट झाले आहे. परिणामी, हे प्राणी दिशाहीन होऊन मानवी वस्तीकडे वळू लागले आहेत. विशेष म्हणजे, चार दिवसांपूर्वीच सुगाव नर्सरी भागात ४ ते ५ महिने वयाचे एक पिल्लू मृतावस्थेत आढळले होते. त्यानंतर आज थेट घरात पिल्लू घुसल्याने वनपरिक्षेत्रातील बिबट्यांचा वावर आता शहराच्या मध्यवस्तीपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.
नक्की वाचा- शिवजयंती उत्सवानिमित्त पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन; शेकडो शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग
मोक्याच्या ठिकाणी पिंजरे लावण्याचे काम सुरू (Leopard cub)
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक पारधी संतोष, अरुण साळवी, युवराज परते आणि पडोळे यांचे पथक रेस्क्यू ऑपरेशन राबवत आहे. पिल्लू पुन्हा झाडीत किंवा सुरक्षित ठिकाणी लपले असल्याची शक्यता गृहीत धरून परिसरात जाळ्या लावण्यात आल्या आहेत.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी पिंजरे लावण्याचे काम सुरू आहे. पिल्लू रस्ता भरकटल्यामुळे वस्तीत आले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.शहरी भागात अशा प्रकारे बिबट्याचा शिरकाव झाल्याने पालकांमध्ये मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे. घरामागील मोकळ्या भूखंडांवरील वाढलेली झाडे-झुडपे आणि काटवणं बिबट्यांसाठी लपण्याचे सोयीचे ठिकाण ठरत असल्याने, पालिकेने अशा जागांची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.



