संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील घारगाव (Ghargaon) येथे रविवार (ता.२४) रात्रीच्या सुमारास दोन ते अडीच वर्ष वयाचा मादी बिबट्या (Female Lepord) जेरबंद झाला. घारगाव गावाअंतर्गत असणाऱ्या शिदायकवाडी (Shidayakwadi) परीसरात दोन ते तीन बिबटे असल्याचे ग्रामस्थांना वेळोवेळी दिसून आले होते. तर सुनिता जाधव यांच्या वस्ती शेजारी बिबट्याने बोकडाचा फडशा पाडला होता. त्यामुळे परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी पिंजऱ्याची मागणी केल्यानंतर वनविभागाने (Forest Deaprtment) तेथे पिंजरा देखील लावला होता. भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या मात्र रविवारी रात्री अलगद पिंजऱ्यात जेरबंद झाला.
नक्की वाचा : भंडारदऱ्यात ‘थर्टी फर्स्ट’ला पोलिसांचा कडक बंदोबस्त
बिबट्या जेरबंद झाल्याचे समजताच आजुबाजुच्या नागरिकांनी बिबट्या पाहण्यासाठी गर्दी केली होती. तर वनपाल हारुण सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली वनसंरक्षक श्रीकिसन सातपुते, बाळासाहेब वैराळ, दिपक वायळ आदींनी धाव घेत बिबट्याला संगमनेर खुर्द येथील रोपवाटिकेत नेण्यात आले आहे.
अवश्य वाचा : चिअर्स ! थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत मिळणार दारू
दरम्यान घारगाव कळमजाई रोडवर असलेल्या शेख वस्ती परिसरातही कायमच बिबट्याचे दर्शन होत होते. रस्त्याने अनेक शालेय विद्यार्थ्यांची ये जा असते. शेतकऱ्यांनाही शेतात काम करताना भितीच्या सावटाखाली काम करावे लागत होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी मागणी केल्यानंतर तेथेही पिंजरा लावण्यात आला होता. मात्र बिबट्या पिंजऱ्याच्या आजूबाजूला फिरून गुंगारा देत होता.
त्यानंतर लगतच असलेल्या जाधव वस्तीवर बिबट्याने बोकडाचा फडशा पाडल्यानंतर पिंजरा जाधव वस्तीजवळ लावण्यात आला होता. भक्षाच्या शोधात असलेला बिबट्या येथे मात्र अलगद पिंजऱ्यात अडकल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र या परीसरात अजून दोन बिबटे असून वनविभागाने पुन्हा पिंजरा लाऊन उर्वरीत बिबटे जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.