Liquor Store : पाथर्डी : जागतिक महिला दिनाच्या (International Women’s Day) निमित्ताने पहिल्यांदाच महिला ग्रामसभेचे (Gram Sabha) आयोजन करण्यात आले होते. या आयोजित करण्यात आलेल्या महिला ग्रामसभेत गावातील महिलांनी करंजी बसस्थानक चौकातील देशी दारूचे दुकान (Liquor Shop) गावाच्या बाहेर काढण्याच्या ठरावाला शंभर टक्के पाठिंबा देत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.
नक्की वाचा : महाकुंभमेळ्यात ४५ दिवसांत बोट व्यावसायिक कुटुंबानं कमावले ३० कोटी
दारूच्या दुकानामुळे प्रवासी, विद्यार्थी या सर्वांनाच मोठा त्रास
उत्तरेश्वर सभा मंडपामध्ये शनिवारी (ता.८) आयोजित करण्यात आलेल्या महिला ग्रामसभेमध्ये बसस्थानक चौकातील देशी दारूचे दुकान गावाच्या बाहेर काढण्याचा ठराव सरपंच नसीम शेख यांनी मांडला. या ठरावास सूचक म्हणून ग्रामपंचायत सदस्य अलका अकोलकर तर अनुमोदक म्हणून ग्रामपंचायत सदस्य सुरेखा आहेर यांनी भूमिका बजावली. गेल्या अनेक दिवसांपासून बसस्थानक चौकातील देशी दारूच्या दुकानामुळे प्रवासी, शालेय विद्यार्थी या सर्वांनाच मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दारूच्या दुकानामुळे या परिसरात कायम वाद विवाद होतात. अनेकांचे कुटुंब या दारूमुळे उध्वस्त झाली आहेत.
अवश्य वाचा : शेतकऱ्याने लाडक्या ‘नंद्या’ बैलाचा केला दशक्रिया विधी
दारूचे दुकान गावाबाहेर किमान दोन किलोमीटरवर हलवण्यात यावे
त्यामुळे देशी दारूचे दुकान गावाच्या बाहेर किमान दोन किलोमीटर अंतरावर हलवण्यात यावे, यासाठी विरोधी गटाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ४ मार्च रोजी उपोषण केले होते. त्यानंतर सत्ताधारी गटाने देखील सकारात्मक भूमिका घेत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला ग्रामसभेचे आयोजन करून शनिवारी झालेल्या या महिला ग्रामसभेला महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी सर्वानुमते दारूचे दुकान गावाच्या बाहेर काढण्यावर शिक्कामोर्तब केले.
दुकान गावाबाहेर काढण्याच्या ठरावास पूर्णपणे पाठिंबा (Liquor Store)
यावेळी ज्येष्ठ नेते सुनील साखरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रफिक शेख, आबासाहेब अकोलकर, सरपंच नसीम शेख, उपसरपंच गणेश आकोलकर, संगीता अकोकर, रूपाली अकोलकर, मनीषा भिटे, विमल अकोलकर, अलका अकोलकर, सुरेखा आहेर, सीमा सरोदे, सुनीता क्षेत्रे, सिंधुबाई आहेर,अलका मुखेकर, उषा अकोलकर, प्रज्ञा क्षेत्रे, सुनिता मोरे, आशा मोरे, कोकिळा मोरे, मनीषा क्षेत्रे, शारदा अकोलकर, सुरेखा अकोलकर, सविता सावंत, लता अकोलकर यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिला ग्रामसभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या महिला भगिनींचे ग्रामविकास अधिकारी कुमार गणगे यांनी आभार मानले. सुमारे दीडशे महिलांनी ठरावावर सह्या करत दारूचे दुकान गावाबाहेर काढण्याच्या ठरावास पूर्णपणे पाठिंबा दिला.