Loan waiver: संगमनेर: शेतकरी ज्या- ज्या वेळी अडचणीत येतो, त्या-त्यावेळी त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची जबाबदारी सरकारची असते. वेळोवेळी त्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहिलो आहे. आता जबाबदारी या सरकारची जबाबदारी आहे की, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहावे. दुर्देवाने अलीकडे अमेरिकेसोबत काही करार झालेले आहेत. ते शेतकऱ्यांना अधिक अडचणीचे ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे, चिंतेचे वातावरण आहे. त्या कराराच्या बाबतीत पुन्हा फेरविचार झाला पाहिजे. सरकारने कर्जमाफी करून शेतकऱ्यांना कर्जाच्या जोखडातून मुक्त केले पाहिजे, असे माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
अवश्य वाचा- घरकुल योजनेत अनियमिततेचा आरोप; प्रशासनाने चौकशी करण्याचे दिले आश्वासन
अर्थसंकल्पात कर्जमाफीचा समावेश केल्यास आनंदच (Loan waiver)
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभ पार पडला, त्यानंतर माजी मंत्री थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सादर होत असलेल्या अर्थसंकल्पावर आमचे लक्ष आहे. अर्थसंकल्पात कर्जमाफीचा समावेश केल्यास आनंदच आहे. या सरकारने शेतकऱ्याला दुय्यम समजून वागणूक दिली. शेतकऱ्यांनी जागरूक होऊन एकत्रित येत आंदोलन उभे केल्यावर या सरकारला जाग येईल. देशात निर्माण होणारा आर्थिक ताण आज शेतकरी सोसत आहे. कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नाही. सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
नक्की वाचा- संगमनेर तहसील कार्यालयाबाहेर लाचखोर लिपीक जेरबंद; एसीबीची कारवाई
राजकीय दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न (Loan waiver)
सोनम वांगचूक, शंकराचार्य आणि राजकीय नेत्यांवर होत असलेली कारवाई राजकीय दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सरकार छळ करत आहे. सरकारच्या विरोधात जनतेने आवाज उठवला पाहिजे. निवडणुका सदोष पद्धतीने जाहीर केल्यानेच सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप केला. निवडणुका लांबणीवर पडल्याने प्रशासकीय राजवट असून प्रशासक आपल्या मनमानी कारभार करत असून, लोकप्रतिनिधी असणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावर लवकरात लवकर निर्णय द्यावा. आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांसाठी कॉम्रेड अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न ते सुटले पाहिजे, ही अपेक्षा साहजिकपणे त्यांची आहे. फक्त शिष्टमंडळ बोलावून समाधान नाही, प्रश्न सोडवून समाधान करावे, एवढीच अपेक्षा सरकारकडून आहे. तर संगमनेर अकोल्यातील जनतेत भांडण लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. संगमनेरवरून जाणाऱ्या या मूळ मार्गालाच पुन्हा मान्यता द्यावी. पुणे-नाशिक रेल्वेमार्गात खोडा घालू नये, असेही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.



