Local Crime Branch : संगमनेर : स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) सोमवारी (ता.३) संगमनेर तालुक्यात केलेल्या धडक कारवाईत केंद्र सरकारने (Central Government) प्रतिबंधित केलेले तब्बल ४५०० किलो मांगुर मासे हस्तगत केले आहेत. या कारवाईत एकूण १४ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून, या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेस विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी (Kirankumar Kabadi) यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक मेढे यांच्या पथकाने संगमनेर तालुक्यात गुप्त तपास सुरू केला होता.
अवश्य वाचा : श्रीरामपुरात महायुतीला धक्का; नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
नांदुरखंदरमाळ शिवारात ट्रक घेतला ताब्यात
दरम्यान, या पथकास माहिती मिळाली की एका ट्रकमधून प्रतिबंधित मांगुर मासे भरून ते पुण्याकडे जात आहेत. त्यानुसार पोलिसांनी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हेमंत थोरात, पोलीस अंमलदार सुभाष बोडखे व प्रमोद गाडेकर यांच्या सहकार्याने नांदुरखंदरमाळ शिवारात सापळा रचून ट्रक ताब्यात घेतला. तपासात ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर मांगुर मासे आढळले.
नक्की वाचा : नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण;मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
एकूण १४.५० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत (Local Crime Branch)
याप्रकरणी सुकुमार दुलाल घोष (४७, रा. पुतीया, नॉर्थ २४ परगना, पश्चिम बंगाल), तारक दिलीप सरकार (२७, रा. नेहरूबाग, हाबरा, पश्चिम बंगाल), सद्दाम रजरुल सरदार (३३, रा. बारघरीया, सरुफनगर, पश्चिम बंगाल), अझरुल आयजुल मंडल (३६, रा. बारघरीया, सरुफनगर, पश्चिम बंगाल) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मत्स्य विकास अधिकारी प्रतिक्षा सुधाकर पाटेकर व दत्तात्रय संजय मिसाळ यांनी ट्रकची तपासणी करून त्यामध्ये प्रतिबंधित मांगुर मासे असल्याची खात्री केली. त्यानंतर सुमारे ४.५० लाख रुपये किमतीचे ४५०० किलो मासे व १० लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण १४.५० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून प्रतिबंधित माशांचा कायदेशीररीत्या नाश करण्यात आला.
या प्रकरणी मत्स्य विकास अधिकारी पाटेकर यांच्या फिर्यादीवरून घारगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, तसेच घारगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दीपक मेढे, संतोष खैरे, गणेश लोंढे, भिमराज खर्से, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, आकाश काळे, भगवान धुळे, अर्जुन बडे यांनी केली.



