Lok Sabha : नगर : देशभरात लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाराष्ट्रातही महायुती व महाविकास आघाडी यांच्यात जोरदार रस्सीखेच बघायला मिळत आहे. उमेदवारी (Candidate) मिळवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी व त्यानंतर ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांना बंड करण्यापासून रोखणे ही तारेवरची कसरत करतांना पक्षश्रेष्ठींची पुरती दमछाक झाल्याचे चित्र बघायला मिळाले. नगर जिल्ह्यात अहमदनगर व शिर्डी हे दोन लोकसभा मतदारसंघ (Lok Sabha constituency) आहेत. यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघात (Constituency) यावेळी चौरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.
हे देखील वाचा: नगर शहरात पॅलेस्टाईनचा ध्वज फडकवण्याची घटना गंभीर; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
उत्कर्षा रुपवते व अभिजीत पोटेही उत्सुक (Lok Sabha)
हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून या मतदारसंघात गेल्या तीन पंचवार्षिक शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, सध्या शिवसेनेचे दोन गट पडल्याने महायुतीकडून व महाविकास आघाडीकडूनही शिवसेनेचाच उमेदवार देण्यात आला आहे. या मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे व महाविकास आघाडीकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघातून काँग्रेस नेत्या उत्कर्षा रुपवते याही इच्छुक आहेत. मात्र, महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटली आहे. शिर्डीची उमेदवारी काँग्रेसला मिळवण्यात पक्षश्रेष्ठींना अपयश मिळाले आणि त्यामुळे नाराज झालेल्या इच्छुक उमेदवार उत्कर्षा रूपवते काँग्रेसची साथ सोडणार का? अशी चर्चा होत आहे. प्रसारमाध्यमांमध्ये त्यांनी बंडखोरी केल्याच्या वावड्या उठल्या असतानाच, त्यांनी नुकतीच मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेतल्याची छायाचित्रे प्रसारमाध्यमावर झळकली. त्यामुळे त्या वंचितच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तसेच प्रहारचे अभिजीत पोटे यांनीही निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्यांनीही कार्यकर्त्यांच्या भेटीगीठी घेत मतदारससंघात प्रचार सुरु केला आहे. पोटे यांच्या उमेदवारीमुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नक्की वाचा: आता ईडी आणि तपास यंत्रणांची लुडबूड थांबवा; शिंदे गटाचा नेता संतापला
मतदारसंघात चुरस वाढवणार (Lok Sabha)
शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी अनेकदा पक्ष बदल केल्याने त्यांना मतदारांसह मित्रपक्षांच्या नेत्यांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मोदी लाटेवर स्वार होऊन विजयी झालेले शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा संधी मिळाली आहे. त्यांनाही महायुतीतील मित्रपक्षांचे सहकार्य मिळवण्यासाठी कसरत करावी लागणार हे निश्चित आहे. तर उत्कर्षा रूपवते यांच्या राजकीय कारकिर्दीला यावेळी कोणते वळण मिळते, हे आगामी निवडणुकीतून ठरणार आहे. तर प्रहारचे अभिजीत पोटे यांची उमेदवारीही या मतदारसंघात चुरस वाढवणार आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, नेवासे व राहुरी तालुक्यातील काही गावे समाविष्ट आहेत. संगमनेर तालुक्यातून महाविकास आघाडीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांची तर भरभक्कम साथ वाकचौरेंना लागणारच आहे. त्याचबरोबर महसूलमंत्री व भाजपचे स्टार प्रचारक राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी मतदार संघातून सदाशिव लोखंडेंना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावणार आहेत. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अंतिम चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.