Lok Sabha Election : ‘या’ चळवळीमुळे काँग्रेसला बसला होता पराभवाचा धक्का

Lok Sabha Election नगर : भारतात लोकसभा १९५१ साली स्थापन झाली. नगर जिल्ह्यात अहमदनगर व शिर्डी असे दोन लोकसभा मतदार संघ होते.

0
Lok Sabha Election : 'या' चळवळीमुळे काँग्रेसला बसला होता पराभवाचा धक्का
Lok Sabha Election : 'या' चळवळीमुळे काँग्रेसला बसला होता पराभवाचा धक्का

Lok Sabha Election | नगर : भारतात लोकसभा १९५१ साली स्थापन झाली. नगर जिल्ह्यात अहमदनगर (Ahmednagar)शिर्डी (Shirdi) असे दोन लोकसभा मतदार संघ होते. दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. मात्र, १९५७च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) एका चळवळीमुळे राजकीय वातावरण फिरले आणि काँग्रेसच्या (Congress) दोन्ही खासदारांना भरपूर जनहिताची कामे करूनही पराभवाचा धक्का बसला होता.

नक्की वाचा: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगातून सुटणार; हायकाेर्टाचे मुदतपूर्व सुटकेचे निर्देश

xr:d:DAFqpfq8p8c:329,j:2341169375154524542,t:24040104

मोरारजी देसाई, स.का. पाटलांच्या वक्यव्याने वारे फिरले (Lok Sabha Election)

१९५१च्या निवडणुकीत अहमदनगरमधूल उत्तमचंद बोगावत तर शिर्डीतून पंढरीनाथ कानवडे पाटील विजयी झाले होते. दोन्ही खासदारांनी पाच वर्षांत जनहिताची बरीच कामे केली. त्यावेळी महाराष्ट्र हे राज्य नव्हते. नगर जिल्हा हा मुंबई प्रांताचा भाग होता. मात्र, २० नोव्हेंबर १९५५पासून महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र चळवळीने आंदोलनाची मशाल पेटवली आणि राजकीय, सामाजिक वातावरण ढवळून निघाले. सेनापती बापट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एस.एम. जोशी, प्र.के. अत्रे, श्रीपाद डांगे यांच्या सारख्या नेत्यांच्या वैचारिक तोफा धडाडू लागल्या. तर शाहीर अण्णा भाऊ साठे, अमर शेख, गव्हाणकरांनी डफावर थाप देत जनमानसात विरश्री भरली.

मोरारजी देसाई व स.का. पाटील या काँग्रेसच्या नेत्यांच्या वक्तव्याने विस्तवाला वारा दिला. त्यामुळे काँग्रेस विरोधात भडका उडाला. या चळवळीमुळे १९५७ची लोकसभा निवडणूक गाजली. मुंबईसह महाराष्ट्र राज्याची मागणी जोरधरत होती. या मागणीला काँग्रेसचे गुजरातमधील नेते मोरारजी देसाई यांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे काँग्रेस विरोधात वातावरण तापले. यातच स.का. पाटील या काँग्रेसच्या तत्कालीन नेत्यानेही स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या मागणीला विरोध केला.

हे देखील वाचा: मद्यपींनाे लक्ष द्या; जिल्ह्यात चार दिवस ‘ड्राय डे’, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

डाव्यांची ताकद वाढली (Lok Sabha Election)

त्यावेळी नगर जिल्हा हा वैचारिक लोकांचा जिल्हा म्हणून मानला जात होता. अकोले, संगमनेर, पाथर्डी, शेवगाव, पारनेर, श्रीगोंदा या तालुक्यांत कम्युनिस्ट पक्षांची ताकद होती. या तालुक्यांसह जिल्ह्यातील सर्व आर्थिक स्तरातील लोक या आंदोलनात सहभागी झाले. मराठी आणि महाराष्ट्र अस्मिततेचा मुद्दा बनला होता. वसंत बापटांची ‘बिजली’ ही कडाडू लागली होती. भारत स्वतंत्र होऊन अवघे आठ वर्षे झाली होती. मात्र, भाषावार प्रांत निर्मितीचा वाद चिघळला होता. डाव्या विचारांच्या पक्षांची ताकद भलतीच वाढली होती.

जिल्ह्याबाहेरून आले अन् खासदार झाले (Lok Sabha Election)

काँग्रेस विरोधात एक लाट तयार झाली होती. बाहेरच्या उमेदवारांनी नगर जिल्ह्यातील मतदारसंघातून निवडणूक लढवत तत्कालीन विद्यमान खासदारांचा पराभव केला. बापू कांबळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वात निकटवर्तीय कार्यकर्त्यांतील एक होते. आंबेडकरांनी काढलेल्या दोन नियतकालिकांचे ते संपादक होते. तसेच मिलिंद महाविद्यालयात कायद्याचे प्राध्यापकही होते. त्यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी केली. शिर्डीमधून काँग्रेसच्या पंढरीनाथ कानवडे यांचा आंबेडकरांचे सहकारी लेखक, चित्रकार बापू कांबळे यांनी पराभव केला. कांबळे यांना ९२ हजार ५०१ तर कानवडे पाटलांना ५१ हजार ७२ मते मिळाली. अहमदनगर लोकसभा मतदार संघातून कामगार नेते रघुनाथ खाडिलकर यांनी निवडणूक लढविली. ते मूळचे पुणे जिल्ह्यातील. उत्तमचंद बोगावत यांचा रघुनाथ खाडिलकर यांनी पराभव केला. खाडिलकरांना ८५  हजार २६५ मते तर बोगावत यांना ६० हजार ८७३ मते मिळाली. या दोन्ही खासदारांनी पुन्हा नगर जिल्ह्यातून निवडणूक लढविली नाही. मात्र, या दोन्ही नेत्यांनी दुसऱ्या जिल्ह्यातून निवडणूक लढवत पुन्हा खासदार पद भूषविले होते. खाडिलकर काही वर्षे केंद्रात मंत्री होते. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. काँग्रेसचे नेते यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. स.का. पाटलांच्या राजकीय कारकीर्दीला उतरती कळा लागली. यशवंतरावांनी पुन्हा राज्यात काँग्रेसची पाळेमुळे घट्ट रोवण्यास सुरूवात केली. कम्युनिस्ट पक्षातील काही नेते काँग्रेसमध्ये आणण्यात आले. त्यामुळे काँग्रेसची ताकद  वाढत गेली. त्याचा परिपाक पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकांत दिसून आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here