Lok Sabha Elections : संगमनेर: बहुचर्चित २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीची (Lok Sabha Elections) रणधुमाळी सूरु झाली आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या नावाच्या याद्या समोर येऊ लागल्या आहेत. जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या शिर्डी मतदार संघातून, पूर्वाश्रमीच्या शिवसेनेच्या (Shiv Sena) दोन्ही आजी-माजी खासदारांना (MP) उमेदवारी मिळाल्याने ते एकमेकांसमोर दंड ठोकून उभे ठाकले आहेत.
हे देखील वाचा: नगरच्या पहिल्या खासदाराने जनतेसाठी फोडलं होतं सरकारी गोदाम
तिरंगी लढतीची शक्यता (Lok Sabha Elections)
अश्यातच महाविकास आघाडीचे तिकीट माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना गेल्याने, दिवंगत प्रेमानंद रुपवते उर्फ बाबुजी यांच्या नाराज झालेल्या कन्या, काँग्रेसच्या राज्य सरचिटणीस उत्कर्षा रुपवते यांनी वंचितचे नेते प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतल्याने, त्या वंचितकडून आपले नशीब आजमावताहेत की काय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसे झाल्यास शिर्डी मतदार संघातील तिरंगी लढत चुरशिची होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीत शिर्डीची जागा शिवसेनेलाच राहिल्याने अनेक राजकीय खलबतांनंतर शिवसेनेच्या तिकिटावर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंची उमेदवारी घोषित झाली आहे. त्यांच्या विरोधात पूर्वाश्रमीच्या शिवसेनेचे व सध्या शिंदे गटात सामील झालेले विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना शिंदे गटाकडून शिवसेनेच्या तिकिटावर तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे.
नक्की वाचा: उत्कर्षा रुपवते यांच्या रुपाने वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात?
प्रादेशिक पक्षांची फोडतोड (Lok Sabha Elections)
या वेळच्या निवडणूकीचे सूत्र काहीसे बदलले आहे. देशात सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपाने प्रादेशिक व इतर पक्षांची फोडतोड करुन, तिसऱ्यांदा विजयासाठी अबके बार चारसौ पारचा नारा लगावला आहे. त्यासाठी साम, दाम, दंड भेद या सर्व नीतींचा वापरही सुरु केला आहे. महाराष्ट्रात भाजपाने शिवसेनेला मोठे खिंडार पाडून त्याचे विभाजन करीत, शिंदे गटाला आपल्या सोबत घेतले तसेच शरद पवारांची राष्ट्रवादी फोडून महायुती करत अजित पवारांना देखील उपमुख्यमंत्री पदावर बसवले. महायुतीकडून शिंदे गटाने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडेना रिंगणात पुन्हा संधी दिल्याने, त्यांच्या विरोधात दंड थोपटलेल्या वाकचौरे यांच्यासमोर दहा वर्षाच्या गॅपचे संकट उभे आहे. या कालावधीत तुटलेला अथवा कमी झालेला जनसंपर्क थोड्या अवधीत पुन्हा भरुन काढण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. तसेच या वेळी ते कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर जात प्रचारात आघाडी घेणार ते पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात वाकचौरे यांनी विखे पाटलांच्या मतदारसंघात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही. तोच कित्ता त्यांच्यानंतर खासदारकीची धुरा वाहणाऱ्या सदाशिव लोखंडे यांनीही गिरवला. त्यामुळेच लोणी (ता.राहाता) येथील कार्यक्रमात सार्वजनिक व्यासपीठावर वाकचौरे यांनी विखे पाटील यांच्या कृतज्ञतेचा उल्लेख करीत त्यांचे आभार मानले होते. या काळात बहुतांश जनतेला ते कसे आहेत हे माहितही नव्हते ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचू न शकलेले वाकचौरे या वेळी कोणता करिष्मा करतात हे देखील येणारा काळच सांगेल. शिर्डी मतदारसंघात संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, नेवासे व राहुरी तालुक्यातील काही गावे समाविष्ट आहेत. संगमनेर तालुक्यातून महाविकास आघाडीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांची तर भरभक्कम साथ वाकचौरेंना लागणारच आहे. त्याचबरोबर महसूलमंत्री व भाजपचे स्टार प्रचारक म्हणून पक्षाची मोठी जबाबदारी खांद्यावर घेतलेले राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी मतदार संघातून सदाशिव लोखंडेंना निवडून आणण्यासाठी ताकद लावणार हे उघड असल्याने या कुरुक्षेत्रावर सत्ताधारी पक्षाच्या विरोधात दंड थोपटलेल्या वाकचौरे यांच्यासमोरील संकटाचे ढग पाहता ही लढाई वाटते तितकी सोपी जाणार नाही हे मात्र खरं आहे.