Loksabha Election | नगर : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर संविधान तयार करून २६ जानेवारी १९५० रोजी लागू करण्यात आले. विधानसभा व लोकसभा गठीत करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार १९५१ साली पहिली लोकसभा निवडणूक (Loksabha Election) घेण्याचा निर्णय घेण्यात आली. नगर जिल्ह्यात अहमदनगर (Ahmednagar) व कोपरगाव (Kopargoan) असे दोन मतदार संघ निवडणूक आयोगाने तयार केले. अहमदनगर लोकसभा मतदार संघातून उत्तमचंद बोगावत तर कोपरगाव लोकसभा मतदार संघातून पंढरीनाथ कानवडे पाटील जिल्ह्याचे पहिले खासदार झाले. त्यातील उत्तमचंद बोगावत यांनी जनतेसाठी सरकारी गोदाम फोडले होते.
हे देखील वाचा : वसंत मोरेंची वाटचाल ‘वंचित’च्या दिशेने; प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट
भाऊसाहेब फिरोदिया यांचा मोठा प्रभाव (Loksabha Election)
बोगावत हे गांधीवादी विचारांचे स्वातंत्र्यसैनिक होते. थोरस्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब फिरोदिया यांचे काही काळ ते सहायक होते. फिरोदिया यांच्याकडे राहुनच त्यांनी माध्यमिक व उच्च शिक्षण घेतले होते. भाऊसाहेब फिरोदिया यांचा मोठा प्रभाव त्यांच्यावर होता. त्यांनी लोकसभेची निवडणूकही अगदी साधेपणाने लढविली. त्यासाठी त्यांनी खर्च केले फक्त १३ हजार रुपये. ते आचार्य आनंदऋषीजी म.सा. यांचे वर्गमित्र होते. त्यांनी काहीकाळ वकिली व्यवसायही केला. ते नगरचे नगराध्यक्षही होते. मुळा धरण व्हावं म्हणून ते आग्रही होते. त्यासाठी त्यांनी दिग्गज नेते मोरारजीभाई देसाई यांच्याशी टक्कर द्यायला घाबरले नाहीत. त्यांनी गावोगावी टपाल शाखा कार्यालय सुरू करण्याचा ठराव लोकसभेत मांडला. तो मंजूरही झाला. संसद सदस्यांचे निवृत्तीवेतनाची कल्पना त्यांचीच.
भाऊसाहेब फिरोदिया यांच्यामुळेच बोगावत राजकारणात उतरले. मिठाच्या सत्याग्रहात ते सहभागी झाले. त्या वेळी त्यांना महात्माजींना जवळून अनुभवता आले. सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल त्यांना साडेचार वर्षांची शिक्षाही झाली. ती त्यांनी येरवडा व नाशिक येथील कारागृहांमध्ये भोगली. त्यांची मोटार गाडी ब्रिटिशांनी जप्त केली होती. त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागून त्यांनी ती परत मिळविली. वकिलीबरोबर राजकारण आणि समाजकारणही भाऊसाहेबांचे कार्यक्षेत्र झाले. लोकल बोर्डात आणि नंतर नगरच्या नगरपालिकेत ते निवडून गेले. २५ फेब्रुवारी १९४६ ते २२ डिसेंबर १९४७ या काळात ते नगराध्यक्ष होते. त्यांच्याच कारकिर्दीत पिंपळगाव माळवी तलावाचं काम मार्गी लागले. त्यासाठी ते रोज सायकलवरून तिथे जात. पालिकेकडून मिळणारे वेतन आणि भत्ते त्यांनी कधी घेतले नाहीत. नगर दक्षिणमधून त्यांना काँग्रेसची उमेदवारी निश्चित झाली. कोणीतरी त्यांच्या विरोधात कारस्थान करून त्यांचे तिकीट घालवले होते. मात्र, बोगावत थेट लालबहादूर शास्त्री यांना भेटले. शास्त्रींनी बोगावत यांना तिकीट मिळवून दिले.
नक्की वाचा: नवनीत राणांना पाडणार; बच्चू कडूंनी केला निर्धार
भाई सथ्थांचा केला पराभव (Loksabha Election)
अहमदनगर लोकसभा मतदार संघाची पहिली निवडणूक काँग्रेसचे बोगावत विरुद्ध कामगार किसान पक्षाचे भाई सथ्था यांच्यात झाली. बोगावत यांना ८८ हजार ८१५ मते मिळाली. तर भाई सथ्थांना ६७ हजार २३९ मते मिळाली. अशा प्रकारे उत्तमचंद बोगावत २१ हजार ६०० मतांनी निवडून आले. त्याच निवडणुकीत कोपरगाव मतदारसंघातून काँग्रेसकडून पंढरीनाथ कानवडे निवडून आले. भाऊसाहेब व कानवडे दोघेही मित्र होते.
१९५२साली नगर जिल्ह्यात दुष्काळ पडला. कर्जत व जामखेड तालुक्यांत दुष्काळाची दाहकता अधिक होती. लोक बरबड्याची भाकरी खातं. ही परिस्थिती त्यांनी संसदेत मांडली. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांना ही माहिती खोटी वाटली. तेव्हा त्यांनी नगर जिल्ह्यात येऊन परिस्थिती पाहण्याचे आवाहन केले. त्यानुसार बोगावत यांनी पंडित नेहरूंना नगर जिल्ह्यात आणले. तेथे त्यांनी दुष्काळी भाग दाखविला. त्यामुळे दुष्काळग्रस्तांना तात्काळ मदत मंजूर करण्यात आली. याच दुष्काळात त्यांनी रेल्वे पुलाजवळील सरकारी गोदाम फोडून त्यातील धान्य गरजूंमध्ये वाटले होते. या प्रकरणात त्यांना अटक झाली. १९५७च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा फटका काँग्रेसला बसला. त्यात बोगावत यांचा पराभव झाला. १९६२च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा त्यांना काँग्रेसने लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळू लागताच त्यांनी फिरोदिया कुटुंबियांचे उपकार जाणत हे तिकीट मोतिलाल फिरोदिया यांना दिले आणि त्यांना निवडून आणले.