London Misal : नगर : भारतात तसेच लंडनमध्ये शूट झालेल्या ‘लंडन मिसळ’ (London Misal) या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेते भरत जाधव (Bharat Jadhav) अत्यंत हटके भूमिकेत रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा (Movie) ट्रेलर रिलीज सोहळा सर्व कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला.
नक्की वाचा : ‘नट म्हणून तुमच्यात माणूसकीचा ओलावा जागृत राहिला पाहिजे’ – दिलीप प्रभावळकर
‘लंडन मिसळ’ या चित्रपटाचे खास वैशिष्टय म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट प्रेरित आहे. या ट्रेलरमधील चटपटीत सीन्सनी आणि कलाकारांच्या धमाकेदार परफॉर्मन्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
रितिका आणि ऋतुजाचे चित्रपटातील लूक्स कथेतील उत्सुकता वाढवतात तर आपल्या अभिनयातून भरत जाधव पुन्हा एकदा विनोदाची चौफेर फलंदाजी करताना दिसत आहेत. अभिनेता गौरव मोरेनेही नेहमीप्रमाणे हास्याचे षटकार आपल्या सीन्समधून लगावले आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या रिलीजची उत्सुकता वाढली आहे.
हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘धर्मवीर २’ चित्रपटाचा मुहूर्त
या चित्रपटात ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत तर भरत जाधव एका हटके भूमिकेत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना दिसणार आहेत आणि ही प्रेक्षकांसाठी मोठी मेजवानी असणार आहे.
‘लंडन मिसळ’ या चित्रपटाचे निर्माते अमित बसनेट, सुरेश गोविंदराय पै आणि आरोन बसनेट आहेत तर सह-निर्माते सानिस खाकुरेल आहेत. दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे, तर सह-दिग्दर्शन वैशाली पाटील यांनी केले आहे. पटकथा-संवाद ओमकार मंगेश दत्त यांनी लिहिले आहेत.
आदिती आणि रावी या लंडनमध्ये राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींची ही कथा आहे. आपल्या बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक अडी-अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यावेळी ज्या संकटातुन त्यांना जावं लागतं त्याची कथा म्हणजे ‘लंडन मिसळ’.
वैशाली सामंत,रोहित राऊत,वैष्णवी श्रीराम यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या संगीताच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या साई-पियुष या संगीतकारांच्या जोडीनं ‘लंडन मिसळ’ चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक केलं आहे. तसेच, चित्रपटाची गाणी मंदार चोळकर, मंगेश कांगणे आणि समीर सामंत यांनी लिहिली आहेत. येत्या ८ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.