Madhavrao Lamkhade : नगर : शरद पवार (Sharad Pawar) यांनी उमेदवारी नाकारल्यामुळे महाविकास आघाडीतून महायुतीध्ये सहभागी झालेले नगर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माधवराव लामखडे (Madhavrao Lamkhade) यांनी आठच दिवसांत काडीमोड करत पुन्हा घरवापसी केली. बारामतीमध्ये घडलेल्या नाटयमय घडामोडीत लामखडे यांनी पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करत राणी लंके (Rani Lanke) यांच्या प्रचारात सहभागी होण्याची घोषणा बारामतीमध्ये केली.
नक्की वाचा: ‘मला आता मुख्यमंत्रीपदाची लालसा उरलेली नाही’- देवेंद्र फडणवीस
उमेदवारीची केली होती मागणी
विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला या विषयावर महिनाभर खल झाला. अखेर जागा राष्ट्रवादीकडे असल्याने खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी जाहीर झाली. या उमेदवारीसाठी नगर तालुक्यातील मातब्बर नेते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माधवराव लामखडे इच्छुक होते. लामखडे यांनी शरद पवार यांची भेट घेउन उमेदवारी हवी, अशी मागणीही केली होती.
अवश्य वाचा: विधानसभा निवडणुकीच्या काळात मुंबईतील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
खासदार लंकेंच्या माध्यमातून पुन्हा घरवापसी (Madhavrao Lamkhade)
मात्र, पवार यांच्यासह महाविकास आघाडीने केलेल्या सर्वेक्षणानुसार राणी नीलेश लंके यांना उमेदवारी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. शरद पवार यांचा निर्णय न रूचल्याने माधवराव लामखडे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करत उमेदवारीची मागणी केली होती. तिथेही त्यांना उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता. मात्र, अजित पवार यांनीही त्यांना उमेदवारी नाकारली. लामखडे यांनी स्वतःचा अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल केला. मात्र, आता पुन्हा खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून आपण बारामती येथे खासदार शरद पवार यांची भेट घेत पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे लामखडे म्हणाले.