Madhi : पाथर्डी : तालुक्यातील मढी (Madhi) यात्रेत मुस्लिम (Muslim) व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास बंदी करण्याचा ठराव मंजूर केल्याप्रकरणाचे मोठे पडसाद आज उमटले. अनेकांनी हा ठराव करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई (Legal Action) करावी, अशी मागणी केली. तर याच विषयावरून पाथर्डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी ग्रामसभेला उपस्थित असलेले ग्रामपंचायत अधिकारी अनिल सूर्यभान लवांडे यांना नियमबाह्य ठराव का केला म्हणून कारणे दाखवा नोटीस (Show Cause Notice) बजावली आहे.
अवश्य वाचा : तारकर्ली समुद्रात पाच पर्यटक बुडाले;दोघांचा मृत्यू
नोटिसचे २४ तासात उत्तर देण्याचे आदेश
या नोटिसचे २४ तासात उत्तर देण्याचे आदेश बजावले आहे. मढी येथे सरपंच संजय मरकड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत केवळ घरकुलांचे विषय घ्या, असे आदेश पंचायत समिती प्रशासनाने दिले असतानाही पुढील महिन्यात होणाऱ्या यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास बंदी करण्याचा ठराव मंजूर करून घेण्यात आला.

नक्की वाचा : अर्थसंकल्पामुळे नागरिक होतील देश विकासाचे भागीदार – राधाकृष्ण विखे पाटील
ठराव करणाऱ्यांच्या कायदेशीर कारवाईची मागणी (Madhi)
या प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांच्यासह शिवसेना उपजिल्हा प्रमुख रफिक शेख, माजी सभापती मिर्झा मणियार, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, वैभव दहिफळे, शिवाजी बडे, प्रशांत टिमकरे, बंडूपाटील बोरुडे, चंद्रकांत भापकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत हा ठराव करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. तर याच पद्धतीची मागणी वंचित बहुजन आघाडी तसेच भारतीय जनसंसद संघटनेचे राज्याचे अध्यक्ष अशोक सब्बन यांनी केली आहे. तर सोमवारी (ता.२४) दुपारी मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते नासिर शेख, शन्नो पठाण, इसाक शेख, लाला शेख, उबेर आतार,परवेज मणियार, युसूफ शेख, फिरोज शेख, असिफ शेख, मुन्ना खलिफा, नवाब शेख, चांद मोहंमद पटेल, अजिज शेख, पोपट शेख, रफिक शेख यांनी कांबळे यांची भेट घेत ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.