Madhi | पाथर्डी : भटक्यांची पंढरी म्हणून देशभरात लौकिक असलेल्या मढी (Madhi) येथील श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी विठ्ठल राधाकिसन मरकड यांची, तर उपाध्यक्षपदी सुरसिंगराव पवार यांची निवड करण्यात आली. देवस्थानच्या नवनियुक्त विश्वस्त मंडळाची पहिली अधिकृत बैठक रविवारी कानिफनाथ गडावर झाली. यावेळी सर्वानुमते नवीन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
हेही वाचा – शाळा-महाविद्यालयांमध्ये सुरू होणार क्रिएटर लॅब; शैक्षणिक धोरणातील बदलांची नांदी
धर्मादाय आयुक्तांकडून निवड (Madhi)
मढी देवस्थानच्या अकरा विश्वस्तांची २० जानेवारी २०२६ रोजी निवड धर्मादायुक्तांकडून झाली. हे विश्वस्त मंडळ २० जानेवारी २०२६ ते १९ जानेवारी २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर विश्वस्त मंडळातून पदाधिकारी निवडीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत ट्रस्टचे विश्वस्त अनिल साठे यांनी अध्यक्षपदाची सूचना मांडली. त्यावर विश्वस्त उत्तम मरकड यांनी विठ्ठल मरकड यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, जो एकमताने मंजूर झाला.
अवश्य वाचा – केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय? निर्मला सीतारमण यांनी काय सांगितलं?
यांची निवड (Madhi)
या बैठकीत अध्यक्ष विठ्ठल मरकड, उपाध्यक्ष सुरसिंगराव पवार, सरचिटणीस माधुरी गणेश मरकड, चिटणीस अनिल अशोकराव साठे, कोषाध्यक्ष दादासाहेब शिवराम मरकड, तसेच कार्याध्यक्षपदी महादेव कोकाटे यांची निवड करण्यात आली. याशिवाय उत्तमराव शंकर मरकड, अॅड. तानाजी धोंडीराम उर्फ रामचंद्र धसाळ, तानाजी हिरामन शिंदे, मदन विष्णू मरकड व उषा संतोष मरकड हे विश्वस्त म्हणून कार्यरत राहणार आहेत.

नवनिर्वाचित पदाधिकारी व विश्वस्तांनी गटतट विसरून एकजुटीने काम करत नाथ संप्रदायाचा वारसा जपणे, भाविक-भक्तांसाठी अधिक सुविधा निर्माण करणे व देवस्थानचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी यात्रा महोत्सव यशस्वीपणे पार पाडणे तसेच रखडलेली व नियोजित विकासकामे मार्गी लावण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, देवस्थानच्या विकासासाठी माजी विश्वस्त मंडळाला वेळोवेळी मार्गदर्शन करून शासन स्तरावरून भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार मोनिका राजळे यांचे नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाने आभार मानले. भविष्यातही देवस्थानच्या विकासासाठी आमदार राजळे यांचे मार्गदर्शन घेतले जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.
नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास माजी सरपंच भगवान मरकड, उपसरपंच रवींद्र आरोळे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष विष्णू मरकड, माजी कोषाध्यक्ष बबन मरकड, माजी अध्यक्ष सचिन मरकड, राजेंद्र मरकड, अशोक मरकड, पोपट घोरपडे, प्रदीप पाखरे, आदिनाथ पाखरे, किरण मरकड, संतोष मरकड यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी देवस्थानच्या विविध विकासकामांसाठी ग्रामस्थांनी एकजुटीने सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थानच्या सरचिटणीस माधुरी मरकड व कोषाध्यक्ष दादासाहेब मरकड यांनी केले.



