Madhi Holi : पाथर्डी: मढी येथील मानाची होळी (Madhi Holi) सोमवारी (दि. २) शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात प्रज्वलित करण्यात आली. सुमारे चारशे वर्षांची परंपरा जपणाऱ्या या सोहळ्यासाठी राज्यभरातून गोपाळ समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंपरेनुसार मढी ग्रामस्थ या दिवशी होळी साजरी करत नाहीत. होळी प्रज्वलित होताच नाथांचा जयजयकार करत गोपाळ बांधवांनी प्रदक्षिणा घालून श्रद्धाभाव व्यक्त केला. कानिफनाथाच्या मंदिराच्या गड बांधणीसाठी दगडी व चुन्याचे काम गोपाळ समाजाने केले असल्यामुळे होळी पेटवण्याचा मान या समाजाला पारंपरिकरित्या देण्यात आला आहे.
अवश्य वाचा- श्रीरामपूरमधील त्या घटनेवर आमदार जगतापांचे सूचक भाष्य
विधीपूर्वक पूजा करून होळी प्रज्वलित (Madhi Holi)
सायंकाळी वाजत-गाजत मानाच्या गोवऱ्या आणण्यासाठी समाजबांधव कानिफनाथ गड येथे दाखल झाले. समाजाचे मानकरी ज्ञानदेव गव्हाणे (गिऱ्हे) यांना होळीच्या पारापर्यंत गोवऱ्या डोक्यावर घेऊन मिरवण्याचा मान मिळाला. गडावरून मिरवणुकीतून गोवऱ्या दत्त मंदिराजवळील नियोजित स्थळी आणण्यात आल्या. विधीपूर्वक पूजा करून सायंकाळी होळी प्रज्वलित करण्यात आली.देवस्थान समितीच्या वतीने मानकरी माणिक लोणारे (येवला, जि. नाशिक), नामदेव माळी (चिखली, जि. बीड), रघुनाथ काळापहाड (धारवाडी, ता. पाथर्डी), हरिभाऊ हंबीरराव (बेलगाव, जि. बीड), भागीनाथ नवघरे (कोळपेवाडी, ता. कोपरगाव) व ज्ञानदेव गव्हाणे (गोपाळ वस्ती, शिरूर, जि. पुणे) यांचा सत्कार करण्यात आला. समन्वयक झेंडू पवार यांनी याबाबत अधिक माहिती दिली. तालुका प्रशासनाचे अधिकारी व पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मढी देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल मरकड यांनी मानकऱ्यांचे स्वागत केले. संपूर्ण सोहळा शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.



