Madhukar Pichad : राज्यातील पहिले आदिवासी मंत्री हरपले; ज्येष्ठ नेते मधुकर पिचड कालवश

Madhukar Pichad : राज्यातील पहिले आदिवासी मंत्री हरपले; ज्येष्ठ नेते मधुकर पिचड कालवश

0
Madhukar Pichad : राज्यातील पहिले आदिवासी मंत्री हरपले; ज्येष्ठ नेते मधुकर पिचड कालवश
Madhukar Pichad : राज्यातील पहिले आदिवासी मंत्री हरपले; ज्येष्ठ नेते मधुकर पिचड कालवश

Madhukar Pichad : नगर : राज्यातील भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांचे आज (ता. ६) वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. राज्याचे आदिवासी विभागाचे पहिले मंत्री (Tribal Minister) होण्याचा मान त्यांना मिळाला. आयुष्यातील ५५ वर्षे आदिवासींसाठी झटणारा आदिवासींचा नेता अखेर हरपला.

नक्की वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली सही; पुण्यातील रुग्णाला मिळाली मदत

१९८० ते २००४ या काळात सलग सात वेळा आमदार

मधुकर पिचड हे तरुण वयात युवक काँग्रेसचे नेते होते. मुंबई व पुण्यातील काँग्रेसच्या नेत्यांत त्यांची उठबस होती. अकोल्यातील तरुण थेट मुंबई-पुण्यात उच्च शिक्षणासाठी जाणे आणि तेथील नेत्यांबरोबर राजकीय सभा गाजवणे हा चर्चेचा विषय ठरला होता. याच अकोले तालुक्यात निळवंडे धरणासाठीचे आंदोलन सुरू होते. त्यावेळी ते या आंदोलनात सहभागी झाले. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व तत्कालीन आमदार यशवंत भांगरे यांचे निधन झाले. त्यामुळे ही जागा रिक्त होती. पिचड यांचे काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर चांगले वजन होते. काँग्रेस पक्षाने त्यांना विधानसभेचे तिकीट दिले. १९८०च्या त्या निवडणुकीत ते विजयी झाले. निळवंडे धरणग्रस्तांचे पूनर्वसन आंदोलनात त्यांनी मोठा सहभाग घेतला. धरण तयार करण्यात आधीच धरणग्रस्तांचे पुनर्वसन होण्यासाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाल्यावर धरण तयार होण्याचा राज्यातील हा पहिलाच पथदर्शी प्रकल्प ठरला. त्यामुळे ते जलनायक म्हणूनही ओळखले जाऊ लागले.

मधुकरराव पिचड यांनी १९८० ते २००४ या काळात नगरमधील अकोले विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे आमदार म्हणून सलग सात वेळा काम केले. या कालवधीत त्यांनी अगस्ती सहकारी साखर कारखाना व तालुका दूध संघाचे अध्यक्षपद भूषवले. यातील १७ वर्षे ते राज्यात विविध विभागांचे मंत्री होते. तसेच मार्च १९९५ ते जुलै १९९९ या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. नगर व ठाण्याचे ते काही काळ पालकमंत्री होते. या कालावधीत त्यांनी आदिवासी समाजासाठी मोठे काम केले. विशेष करून नगर, नाशिक व पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यातील मुलांना शिक्षणाच्या व विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले.

अवश्य वाचा : टंचाईग्रस्त नागलवाडीत पाणीच पाणी; जलयुक्त शिवारने केली किमया

ब्रेनस्ट्रोक झाल्याने रुग्णालयात केले होते दाखल (Madhukar Pichad)

काँग्रेसमध्ये असताना ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात होते. शरद पवारांनी काँग्रेस सोडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यावर मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही ते २०१४ पर्यंत ते आमदार होते. २०१४मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मधुकर पिचडांऐवजी त्यांचे पूत्र वैभव पिचड यांना विधानसभेचे तिकीट दिले. वैभव पिचड हे २०१४ ते २०१९ या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. मात्र, २०१९मध्ये मधुकर पिचड व वैभव पिचड यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पिचड कुटुंबाशी पवार कुटुंबाचे स्नेहपूर्ण संबंध संपुष्टात आले. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी करणाऱ्या वैभव पिचडांना पराभव सहन करावा लागला. त्या पाठोपाठ अगस्ती सहकारी साखर कारखाना व राजूर ग्रामपंचायतमध्येही पिचडांना पराभव सहन करावा लागला. २०२४च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मधुकर पिचडांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रोक झाल्याने त्यांंना नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथेच त्यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. 

राज्याचे पहिले आदिवासी बजेट (Madhukar Pichad)

शरद पवार मुख्यमंत्री असताना पालघर परिसरातील एका पाड्यावर कुपोषणाने बालकाचा मृत्यू झाला होता. ही माहिती मिळताच शरद पवार हे मधुकर पिचडांना घेऊन पालघरच्या दिशेने निघाले. मात्र, बालक मृत्यू झालेल्या पाड्यापर्यंत रस्ता नसल्याने शरद पवार व पिचडांना चक्क १४ किलोमीटर पायी चालत जावे लागले होते. पायी चालत आलेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, या भागात वीज, पाणी, रस्ते हे पोहोचलेच नाहीत. त्यामुळे निराश झालेल्या पवार व पिचडांनी मृत बालकाच्या कुटुंबाचे सांत्वन केले. त्यांना शासकीय मदत जाहीर केली. त्यानंतर हे दोघे मुंबईला आले. शरद पवारांनी आदिवासींसाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करण्याचा व त्यासाठी स्वतंत्र बजट तयार करण्याचा निर्णय घेतला. देशात हे पहिल्यांदा घडत होते. पवारांनी पिचडांना आदिवासी विभागाचे मंत्री केले. याच पिचडांनी आदिवासी मंत्रालयाचे पहिले बजेट सादर केले. ही देशातील ऐतिहासिक घटना ठरली. महाराष्ट्राच्या आदिवासी विभागाने मोठे काम उभे केले. त्यामुळे देशातील इतर राज्यांनीही आदिवासी मंत्रालय तयार करत त्यासाठी स्वतंत्र बजेटची तरतूद केली. मधुकर पिचडांनी आयुष्यभर आदिवासींसाठी काम केले. आदिवासी पाड्यापर्यंत वीज, पाणी, शिक्षण अशा मूलभूत गरजा मिळाव्यात यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले. २०१९ नंतर त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी सुरू झाल्या. तरीही त्यांनी अकोले नगरपंचायत निवडणुकीत प्रचाराचा धुरळा उडवून देत भाजपला सत्ता मिळवून दिली.