नगर : राज्य शासनाकडून दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना प्रदान करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ ५७ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. वरळीतील एनएससीआय डोममध्ये हा सोहळा पार पडला. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसह मराठी रंगभूमीवरील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
नक्की वाचा : ५७ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ;’या’ कलाकारांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
अशोक सराफ काय म्हणाले ?(Maharashtra Bhushan Award)
यावेळी अशोक सराफ म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि एक नंबरचा पुरस्कार मला प्रदान केलात. त्याचा मला खरोखरच खरोखरंच आनंद होत आहे. कारण ज्या महाराष्ट्रामध्ये मी जन्मलो, त्या माझ्या कर्मभूमीत माझा सन्मान केला, याच्यापेक्षा कोणती मोठी गोष्ट नाही. महाराष्ट्र शासनाचे त्याबद्दल मी अभिनंदन करतो. ज्या लोकांना हा पुरस्कार प्राप्त झालाय ती यादी खूप मोठ्या लोकांची आहे. मला या यादीमध्ये तुम्ही बसवलं ही माझ्यासाठी कधीही न विसरणारी गोष्ट असल्याचं अशोक सराफ म्हणाले.
अवश्य वाचा : ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ लवकरच चित्रपटगृहात
महाराष्ट्राचा प्रेक्षक बुद्धिमान आणि खडूस – अशोक सराफ (Maharashtra Bhushan Award)
महाराष्ट्राचा जो प्रेक्षक आहे तो अतिशय बुद्धिमान आणि खडूस आहे. कारण त्यांना जर आवडलं तर डोक्यावर घेतील नाही तर पाहणारही नाहीत. अशा प्रेक्षकांसमोर काहीही सादर करून चालणार नाही. आपल्याला नेहमी भान ठेवावं लागतं की समोर बसलेल्या प्रेक्षकांना आवडेल का? मग त्यावेळी आमच्या आणि दिग्दर्शकाला आवडेल की नाही हा प्रश्न वेगळा पण प्रेक्षकांना आवडलं पाहिजे, हाच दृष्टीकोन समोर मी आतापर्यंत ठेवला. कारण श्रेष्ठ शेवटी प्रेक्षकच, असं अशोक सराफ म्हणाले.