Maharashtra Kesari : माऊली जमदाडे, बाला रफिक शेख, हर्षवर्धन सदगीर, हर्षद कोकाटे यांचे आव्हान संपुष्टात; महाराष्ट्र केसरी स्पर्धा

Maharashtra Kesari : माऊली जमदाडे, बाला रफिक शेख, हर्षवर्धन सदगीर, हर्षद कोकाटे यांचे आव्हान संपुष्टात; महाराष्ट्र केसरी स्पर्धा

0
Maharashtra Kesari
Maharashtra Kesari

Maharashtra Kesari : नगर : महाराष्ट्रात (Maharashtra) अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या (Wrestling Competition) तिसऱ्या दिवशी दोन्ही सत्रातील उत्कंठावर्धक लढतींनी कुस्ती शौकीनांची मने जिंकली. माती विभागात महेंद्र गायकवाड, संदीप मोटे, वेताळ शेळके, विशाल बनकर,  अनिकेत मांगडे, आकाश रानवडे तर गादी विभागात महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, पृथ्वीराज मोहोळ, सुदर्शन खोतकर यांची आगेकूच तर महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख, हर्षवर्धन सदगीर यांच्यासह महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या ज्ञानेश्वर जमदाडे, हर्षद कोकाटे, शुभम शिंदनाळे, श्रीमंत भोसले, नरेश म्हात्रे, गणेश कुकुते, अभिमन्यू फुले, भरत कराड, रमेश बहिरवाल, वैभव माने यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.

अवश्य वाचा : ‘धनंजय मुंडे गुन्हेगार नाही,मी त्यांच्या पाठीशी’-नामदेव शास्त्री

लढती पहाण्यासाठी मोठ्या संख्येने कुस्ती शौकीन दाखल

संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतींना सायंकाळी सुरुवात झाली. या लढती पहाण्यासाठी अहिल्यानगरसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने कुस्ती शौकीन दाखल होते. राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस व स्पर्धेचे आयोजक आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत कुस्त्या रंगल्या.

नक्की वाचा : मंत्र्यांना व त्यांच्या पोरांना धरायचं आणि हाणायचं; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

काही गतविजेत्यांचा अनपेक्षितपणे पराभव (Maharashtra Kesari)

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने व अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि आमदार संग्रामभैया जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीने अहिल्या नगर येथील स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरी, वाडीया पार्क येथे सुरू असलेल्या ६७ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शुक्रवारी तिसऱ्या दिवशीच्या सकाळ व सायंकाळच्या सत्रात माती व गादी विभागातील ५७, ८६ , ६१, ७९ , ६५, ७४, ९२ आणि महाराष्ट्र केसरी (८६ ते १२५ ) किलो वजनी गटातील काही गटातील गतविजेत्यांना अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले. तर काहींनी धक्कादायक निकालाची नोंद करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला.

माती विभागात महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या सोलापूरचा उप महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत एकेरी व दुहेरी पटांच्या डावांवर निर्धारित वेळेत ५-० गुणांने कोल्हापूरच्या शुभम शिंदनाळेचा पराभव केला.तर सांगलीच्या संदीप मोटे याने साताऱ्याच्या गणेश कुकुते याचा ६-०, सोलापूरच्या विशाल बनकर व अमरावतीच्या ज्ञानेश्वर जमदाडे यांच्यात अत्यंत प्रेक्षणीय लढत झाली. पहिल्या फेरीत दोघेही आक्रमक पवित्रा घेत गुणांची कमाई करण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये ज्ञानेश्वरला फारसे यश मिळाले नाही. पहिल्या फेरीत विशाल बनकरने ७-० अशी निर्णायक आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल केली होती. मात्र पिछाडीवर पडलेल्या ज्ञानेश्वरने आक्रमक आणि सावध पवित्रा घेत विशालचे डाव प्रतिडाव हाणून पाडत २ गुणांनी खाते उघडले. पुन्हा एकदा विशालने २ गुण घेत गुणांची संख्या ९ वर नेली. पुन्हा एकदा पिछाडीवर पडलेल्या ज्ञानेश्वरने विशालचे दुहेरीपट काढून ४ गुणांची कमाई करत लढतीत रंगत निर्माण केली, पुन्हा एक गुणांची कमाई केल्याने ९-७ असा गुणफलक झाला. मात्र कुस्तीची निर्धारित वेळ संपल्याने विशालने हि लढत ९-७ अशी जिंकत आगेकूच केली तर ज्ञानेश्वरचे आव्हान संपुष्टात आल्याने त्याचे पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी होण्याचे स्वप्न भंगले.

दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने कोल्हापूरच्या श्रीमंत भोसले याचा १०-० अशा गुणाधिक्यांनी पराभव करत विजयी घोडदौड राखणाऱ्या महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरची विजयी घोडदौड पुढच्या फेरीत विशाल बनकरने रोखत त्याचे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्याचे स्वप्न संपुष्टात आणले. या लढतीत पहिल्या फेरीत दोघांनी एकेक गुणांची कमाई करत बरोबरी साधली. पुढच्या फेरीत दोघांनीही आक्रमक पवित्रा घेतला. विशाल बाहेर गेल्याने हर्षवर्धन एक गुण मिळाला आणि गुणांची संख्या २-१ अशी झाली. पिछाडीवर पडलेल्या विशाल पुन्हा एक त्यानंतर हर्षवर्धनचा दुहेरी पट काढून ४ गुणांची कमाई करत लढतीत रंगत निर्माण केली. पुन्हा साल्तो डावावर २ गुण वसूल करून कुस्तीच्या निर्धारित वेळेत विशालने ही लढत ८-२ अशी जिंकत उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला.

६१ किलो गादी विभाग
प्रथम – अजय कापडे – कोल्हापूर
व्दितीय – पुरुषोत्तम विसपुते- धुळे
तृतीय – पवन डोनर – नाशिक
तृतीय – पांडुरंग माने – सांगली

६१ किलो माती विभाग
प्रथम – सुरज आस्वले – कोल्हापूर
द्वितीय – स्वरुप जाधव – कोल्हापूर
तृतीय – अमोल वालगुडे – पुणे

७९ किलो गादी विभाग
प्रथम – शुभम मगर – सोलापूर
व्दितीय – केतन घारे – पुणे
तृतीय – संदीप लटके – अहील्यानगर
तृतीय – संदीप यादव – मुंबई उपनगर

७९ किलो माती विभाग
प्रथम – संदेश शिपकुले – सातारा
व्दितीय – ऋषिकेश शेळके – अहिल्यानगर
तृतीय – नाथा पवार – सांगली

महाराष्ट्र केसरी गादी विभागात आज होणाऱ्या सर्व प्रेक्षणिय कुस्त्या

शिवराज राक्षे ×  सुदर्शन खोतकर
पृथ्वीराज मोहोळ  × धनाजी कोळी
सतपाल शिंदे  × सतीश मुडे
सागर खरात × चेतन रेपाळे

महाराष्ट्र केसरी माती विभाग आज होणाऱ्या सर्व प्रेक्षणिय कुस्त्या
 
महेंद्र गायकवाड  ×  संदीप मोटे
वेताळ शेळके  × प्रकाश बनकर
साकेत यादव × विक्रम भोसले
आकाश रानवडे × सुहास गोडगे