Maharashtra Kesari | पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी

0
Maharashtra Kesari
Maharashtra Kesari

Maharashtra Kesari | नगर : अहिल्यानगर येथील महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धेत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ व महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड या मल्लांच्यात किताबी लढत झाली. या प्रेक्षणीय लढतीत पृथ्वीराजने गुणांच्या आधारावर लढत जिंकत महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा मिळवली. स्पर्धेचा विजेता पृथ्वीराज मोहोळ याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान करण्यात आली. राज्यातील क्रीडा विकासाला चालना देतांना प्रत्येक खेळासाठी आवश्यक आर्थिक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.

अवश्य वाचा : ‘धनंजय मुंडे गुन्हेगार नाही,मी त्यांच्या पाठीशी’-नामदेव शास्त्री

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढती व बक्षीस वितरणासाठी केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रेय भरणे, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, आमदार संग्राम जगताप, काशिनाथ दाते, किशोर दराडे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार अरुण जगताप, भिमराव धोंडे, लहू कानडे,  पद्मश्री पोपटराव पवार, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, सरचिटणीस हिंदकेसरी योगेश दोडके, जिल्हा कुस्तीगीर कार्याध्यक्ष संघाचे संतोष भुजबळ, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे, भारतीय युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले आदी उपस्थित होते.

नक्की वाचा : मंत्र्यांना व त्यांच्या पोरांना धरायचं आणि हाणायचं; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

मातीतील कुस्तीचा अंतिम सामना (Maharashtra Kesari)

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील माती विभागातील अंतिम सामन्यात साकेत यादव (परभणी) विरुद्ध महेंद्र गायकवाड (सोलापूर) यांच्यात अंतिम लढत झाली. यात पहिल्या फेरीत साकेत २-१ अशा गुणाने आघाडीवर होता. दुसऱ्या फेरीत महेंद्र गायकवाडने आक्रमक खेळ सुरू केला. त्याने सुरुवातीला चार गुणांची आघाडी घेतली त्यानंतर मात्र आणखी आक्रमक खेळी करत महेंद्र गायकवाडने अनुभव पणाला लावत साकेत यादवला चितपट करत महाराष्ट्र केसरीच्या माती विभागात प्रथम आला. 

शिवराज राक्षेची नाराजी (Maharashtra Kesari)

गादी विभागातील अंतिम सामना शिवराज राक्षे (नांदेड) विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ (पुणे) यांच्यात झाला. सामना सुरू होताच पृथ्वीराजने आक्रमक खेळी सुरू करत शिवराज राक्षेवर पकड मिळवली. याने पहिल्या एका मिनिटांतच महाराष्ट्र केसरी पहिलवान शिवराज राक्षेला चितपट करत अस्मान दाखवले. त्यानंतर नाराज झालेल्या शिवराज राक्षेने तडकाफडकी मैदान सोडले. मैदान सोडताना त्याने पंचांवर नाराजी व्यक्त केली. त्याला हा निकाल मान्य नव्हता. माझी पाठ टेकलीच नव्हती. सामन्याची क्षणचित्रे तपासली जावीत, असे त्याने उपस्थित पत्रकारांना सांगितले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर शिवराजला मैदानापासून दूर करण्यात आले.

स्पर्धेचा किताबी लढतीचा निकाल गुणांच्या आधारावर करण्यात आला. यात केवळ एका गुणाने महेंद्र गायकवाडचा पराभव झाला. विजयानंतर पृथ्वीराज मोहोळ व त्याच्या मित्रांनी एकच जल्लोष केला. किताबी लढतीनंतर आयोजकांतर्फे जोरदार आतषबाजी करण्यात आली. 

स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राज्यातील क्रीडा रसिकांनी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला. स्पर्धेसाठी पारितोषिकेही मोठी ठेवण्यात आली आहेत. गेले पाच दिवस स्पर्धेच्या भव्य आयोजनाचा आनंद राज्याच्या जनतेला घेता आला. यापुढेदेखील या स्पर्धेचे आयोजन करतांना या स्पर्धेचे दिमाखदार आयोजनाचे आव्हान आयोजकांसमोर असेल. खेळांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य शासन देखील प्रयत्नशील आहे.  प्रत्येक खेळाच्या विकासासाठी राज्य शासन सहकार्य करेल आणि अहिल्यानगरच्या क्रीडा विकासासाठीदेखील आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे भव्य आयोजन झाल्याचे नमूद करून केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, ही मानाची स्पर्धा आहे. स्व.मामासाहेब मोहोळ यांनी या स्पर्धेला सुरूवात केली. त्यानंतर राज्यात कुस्तीच्या वैभवात भर पडून ही परंपरा आणखी पुढे जात आहे. महाराष्ट्र कुस्तीची पंढरी आहे. राज्याने देशाला अनेक मल्ल दिले. महाराष्ट्राच्या तीन मल्लांना शासनाने वर्ग एक दर्जाच्या पदावर नियुक्ती दिली आहे.  येत्या काळातही कुस्तीला राजाश्रय मिळेल असा विश्वास व्यक्त करून राज्याची ही परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कुस्ती खेळाला डोपींग सारख्या प्रकाराने गालबोट लागू नये यासाठी  येत्या काळात अधिक प्रयत्न होतील, असे त्यांनी सांगितले.

प्रास्तविकात आमदार जगताप यांनी कुस्ती स्पर्धेविषयी माहिती दिली. लाल मातीच्या खेळातून संस्कार होत असल्याने राज्यभरात या खेळाचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या कुस्ती स्पर्धेमुळे अहिल्यानगरचे नाव प्राधान्याने घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here