Maharashtra Kesari Wrestling Tournament : कर्जत : कर्जत शहरात बुधवारपासून ६६ व्या महाराष्ट्र केसरी किताबासाठी कुस्ती स्पर्धेचा (Maharashtra Kesari Wrestling Tournament) थरार रंगणार असून यासाठी अनेक नामवंत पैलवान संत सदगुरु गोदड महाराज (Sant Godad Maharaj) क्रीडा नगरीत दाखल झाले आहे. संध्याकाळी कुस्ती मैदानाचे भूमिपूजन कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी, सर्व सामाजिक संघटनेचे श्रमप्रेमी यांच्यासह कर्जत-जामखेडच्या कुस्ती प्रेमींच्या हस्ते संपन्न झाले. सदरची कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) मित्रमंडळ कर्जत-जामखेड यांनी आयोजन केले आहे.
नक्की वाचा : बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित;विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची घोषणा
कर्जत शहरात दि २६ मार्च ते ३० मार्च या कालावधीत कुस्ती स्पर्धा
कर्जत शहरात दि २६ मार्च ते ३० मार्च या कालावधीत दादा पाटील महाविद्यालयाच्या समोरील प्रांगणात विविध वजनी गटात महाराष्ट्र केसरी ६६ व्या किताबासाठी कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या आहेत. यासाठी गादी आणि माती विभागासाठी प्रत्येकी दोन मैदान तयार करण्यात आले आहेत. या मैदानावर बुधवारपासून कुस्तीचा थरार रंगणार असून बुधवारी संध्याकाळी मैदानाचे भूमिपूजन कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेव मोहिते, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष संभाजी वरुटे, वरिष्ठ उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, खजिनदार सुरेश पाटील, गणेश कोहळे, ललित लांडगे, बंकट यादव, नवनाथ ढमाळ, नाना डोंगरे, चंद्रकांत शिंदे, पंकज हारपुढे, स्पर्धा प्रमुख ऋषीकेश धांडे यांच्यासह सर्व कुस्तीप्रेमी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकाऱ्यांसह अनेक नामवंत पैलवान उपस्थित होते.
अवश्य वाचा : माध्यमिक शिक्षक सोसायटीत ‘परिवर्तन’
पहिल्या दिवशी गादी आणि माती विभागात कुस्ती (Maharashtra Kesari Wrestling Tournament)
बुधवारी सकाळपासूनच कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नांदेड, मुबंई, पुणे, नागपूर, धाराशिव, सोलापूर, बीड येथील पैलवानांनी नोंदणी करीत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच पंच उजळणी उपस्थितांसमोर झाली. पाच दिवस या नामवंत कुस्ती मल्लात प्रेक्षणीय कुस्त्यांचा थरार आकर्षक विद्युत रोषणाईत रंगणार आहे. पहिल्या दिवशी गादी आणि माती विभागात ५७, ६५ आणि ७४ किलो वजनी गटात काळजाचा ठोका चुकविणारी कुस्ती प्रेक्षकांनी अनुभवली. मल्लाना प्रेरणा आणि ऊर्जा मिळावी यासाठी तुतारीचा आणि हलगीचा नाद मैदानात घुमला. यासह आपल्या बहारदार आवाजाने निवेदकांनी कुस्तीचे विश्लेषण केले.
मैदानात आजमितीस झालेले सर्व महाराष्ट्र केसरी यांचे सालनिहाय छायाचित्र लावण्यात आले आहेत. या स्पर्धेत क्रिडा आणि कुस्तीप्रेमीसाठी भव्य असा प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आले असून यासह प्रेक्षकांची संख्या अधिक झाल्यास मैदानाबाहेर देखील स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती स्पर्धा प्रमुख पैलवान ऋषीकेश धांडे यांनी दिली. रविवारी अंतिम लढतीत जेष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार बक्षीस वितरणासाठी उपस्थित राहणार आहे. पाच दिवसात या कुस्ती मैदानासाठी आजी-माजी महाराष्ट्र केसरी विजेत्यांसह अनेक नामवंत मल्ल हजेरी लावणार आहेत.
पाच दिवसांत विविध वजनी गटात रंगणार कुस्ती. रविवारी महाराष्ट्र केसरी किताबाची अंतिम कुस्ती होणार.
बुधवार, दि २६ रोजी ५७, ६५ आणि ७४ किलो वजनी गट, गुरुवार दि २७ रोजी ६१, ८६ ते १२५ वजनी गट, शुक्रवार दि २८ रोजी ७०, ७९ आणि ९२ वजनी गट तर शनिवार दि २९ रोजी ८६ आणि ९७ किलो वजनी गटात कुस्ती सामने रंगणार आहेत. तर महाराष्ट्र केसरी किताबासाठी अंतिम सामना रविवारी रंगणार असून यात ६६ वा महाराष्ट्र केसरी किताब कोण पटकावणार ? याची उत्सुकता शिंगेला पोहचली आहे.
फेब्रुवारी महिन्यात अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडीने कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली होती. यावर अनेकांनी क्रीडा क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप नको म्हणून प्रतिक्रिया दिल्या होत्या. तदनंतर कर्जतमध्ये पुन्हा दोनच महिन्यात सदरची स्पर्धा पार पडत असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकाऱ्यांनी सदरची स्पर्धा पारदर्शक आणि मैदानावरील सर्वोत्तम खेळाच्या गुणवत्तेवरच पार पडेल अशी ग्वाही दिली.
कर्जत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी एकूण ४५ पैकी ४३ संघ दाखल झाले असून यात तब्बल ८०० मल्लाचा समावेश आहे. त्यांच्या सोबत जवळपास १०० च्या आसपास प्रशिक्षक आणि व्यवस्थापक उपस्थित आहे. यासह प्रत्येक कुस्तीसाठी निळ्या रंगाच्या टी शर्टमध्ये १०० मॅच रेफरी हजर आहेत. मैदानात तांत्रिकदृष्ट्या आधार घेतच कुस्तीचा निकाल जाहीर केला जात आहे.