Mahavikas Aghadi | नगर : नगर जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यातील अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक राज्यात चर्चेचा विषय ठरली. या निवडणुकीत नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी २८ हजार ९२९ मतांनी विजय मिळवत चर्चेला पूर्णविराम दिला. पक्षीय राजकारण विरहित ही लढत झाली. आरोप-प्रत्यारोपांच्या धुळवडीत रंगलेली ही निवडणूक सर्वांसाठीच उत्कंठेचा विषय ठरली. दुसरीकडे शिर्डी मतदारसंघात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांनी सदाशिव लोखंडे यांचा ५० हजार ५२९ मतांनी पराभव केला. जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) विजय मिळवला आहे.
हे देखील वाचा: शिक्षक मतदारसंघात रंगणार विखे-कोल्हे संघर्ष; राजेंद्र विखे पाटील दाखल करणार आज उमेदवारी अर्ज
नीलेश लंके यांनी महायुतीच्या नेत्यांशी जवळीक साधली (Mahavikas Aghadi)
नगर जिल्ह्यातील राजकारण हे नेहमीच पक्ष विरहित असल्याचे सांगितले जाते. या नगरी राजकारणाचा प्रत्यंतर घडविणारी ही निवडणूक ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे उमेदवार आमदार नीलेश लंके यांनी महायुतीच्या नेत्यांशी जवळीक साधली तर भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर मतांचे दान मागितले होते. मात्र, राजकारण ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फिरत लंकेंना विजय मिळवून दिला. अखेर विखे कुटुंबाला पराभव करण्याची शरद पवार यांची इच्छा पूर्ण झाली.
नक्की वाचा: नगर, शिर्डी लाेकसभा काेण जिंकणार? एक्झिट पोलने काय वर्तविले भाकीत?
जिल्ह्यातील राजकारणात दूरगामी परिणाम (Mahavikas Aghadi)
लंके हे मागील तीन वर्षांपासून या निवडणुकीची तयारी करत होते. त्यांनी निवडणुकीच्या आधी ऐन वेळी अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपमधील नाराजांचे लंके यांना पाठबळ मिळाले. त्यामुळे विखेंना एकाकी लढत द्यावी लागली. तरीही त्यांनी लंके यांना मोठी लढत दिली. तर महाविकास आघाडीत असलेले नेते लंके यांच्या मागे ठामपणे उभे राहिले. महायुतीतील काही नेत्यांनी विधानसभेचे राजकारण लक्षात घेत राजकीय खेळ्या खेळल्या. याचा फटका विखे यांना बसल्याची चर्चा आहे. हा पराभव विखेंना जिव्हारी लागला असून याचे जिल्ह्यातील राजकारणात दूरगामी परिणाम होतील, असे बोलले जात आहे.
नक्की वाचा: 100 टन सोनं ब्रिटनमधून आलं भारतात
लोखंडे यांच्या विरोधात नाराजी (Mahavikas Aghadi)
शिर्डी मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे हे सलग दोन वेळा खासदार राहिले होते. मात्र, त्यांच्या विरोधात मोठी नाराजीची लाट होती. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी या पूर्वी खासदारकीच्या काळात केलेल्या कामांमुळे जनतेने त्यांना चांगला प्रतिसाद दिला. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी या मतदारसंघात तिरंगी लढत उभी केली. रुपवते यांच्या उमेदवारीचा फायदा होईल, अशी अपेक्षा लोखंडे यांना होती. मात्र, प्रत्यक्षात जनतेने वाकचौरे यांना मतांचे मोठे दान दिल्याने लोखंडे यांना विजय मिळविता आला नाही.