Mahayuti vs Mahavikas Aghadi | नगर : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच देशात आचार संहिता लागू झाली. तसे राजकीय वातावरण ऐन उन्हाळ्यात आणखीनच तापू लागले आहे. महायुती (Mahayuti) व महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार निश्चित झाले आहेत. आचार संहिता लागू होण्यापूर्वीच भाजपने (BJP) अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील आपला उमेदवार जाहीर केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाचे आमदार नीलेश लंके यांना तांत्रिक अडचणींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेशाला वेळ लागला. काल (शुक्रवारी) त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत शरद पवार गटात प्रवेश केला तर शिर्डी लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या शिंदे गटाने गुरुवारी (ता. २८) आपला उमेदवार जाहीर करताच जिल्ह्यात राजकीय रंगपंचमीला सुरुवात झाली.
हे देखील वाचा : वसंत मोरेंची वाटचाल ‘वंचित’च्या दिशेने; प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट
अहमदनगर मतदारसंघात भाजपचा तर शिर्डी मतदार संघात शिवसेनेच्या ठाकरे गटाचा उमेदवार आधीच निश्चित होता. फक्त प्रतीक्षा दुसऱ्या बाजूने कोण? याची होती. त्याचा निकाल मागील दोन दिवसांत लागला आणि ऐन रंगपंचमीपासून राजकीय ‘धुळवडी’ला सुरुवात झाली. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी जाहीर होताच ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी प्रतिक्रिया देताना जोरदार टीका केली. तर नीलेश लंके यांनी काल (शुक्रवारी) शरद पवार गटात प्रवेश करण्यापूर्वी आमदारकीचा राजीनामा देताना तब्बल सव्वा तासांचे भाषण केले. यात ते भावूकही झाले. भावनेच्या भरात त्यांनी विखे पिता-पुत्रांवर टीकेचा भडीमार केला. वाकचौरे व लंकेच्या या टीकांना अजून दुसऱ्या बाजूने प्रतिउत्तर रंगपंचमीच्या दिवशी मिळेल, अशी अपेक्षा आहे. या आरोप-प्रत्यारोपाने राजकीय रंगपंचमी पहायला मिळेल.
नक्की वाचा: नवनीत राणांना पाडणार; बच्चू कडूंनी केला निर्धार
एकीकडे तरुण तर दुसरीकडे ज्येष्ठांत लढती
जिल्ह्यातील ही निवडणूक प्रामुख्याने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, अशी होण्याची शक्यता आहे. शिवाय वंचित बहुजन आघाडी, सकल मराठा समाज, सकल ओबीसी समाज, कम्युनिस्ट पक्ष आदीही स्वतःचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवतील. मात्र, सध्या महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यातील लढती ठरल्या आहेत. अहमदनगर लोकसभा मतदार संघातून विखे व लंके यांच्यात लढत होईल. दोन्ही उमेदवार तसे वयाने तरूण आहेत. नीलेश लंके ४४ वर्षांचे तर डॉ. सुजय विखे पाटील हे ४१ वर्षांचे आहेत. दोघांनीही २०१९मध्ये पहिली निवडणूक लढवत विजय मिळविला होता. लंके यांना विधानसभेत तर डॉ. विखे पाटलांना संसदेत पाच वर्षे काम करण्याचा अनुभव आहे. मात्र, सुजय विखे पाटलांचे आजोबा बाळासाहेब विखे पाटील हे आठ वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांच्या सानिध्यात सुजय विखेंनी राजकीय धडे गिरविल्याचे सांगितले जाते. तर लंके यांनी शिवसेना व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असे २० वर्षांपेक्षाही अधिक काळ संघटनात्मक बांधनीचे काम केले आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघात दोन्ही उमेदवार ज्येष्ठ आहेत. दोघांनाही राजकीय व प्रशासकीय अनुभव दीर्घ आहे. भाऊसाहेब वाकचौरे हे ७४ वर्षांचे तर सदाशिव लोखंडे हे ६१ वर्षांचे आहेत. भाऊसाहेब वाकचौरे हे निवृत्त सनदी अधिकारी आहेत. २००९ ते २०१४ या कालावधीत ते शिर्डी मतदार संघाचे खासदार होते. तर सदाशिव लोखंडे हे तरुण वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा कार्यात सक्रीय होते. १९९५ ते २००९ असे सुमारे १५ वर्षे ते कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात आमदार होते. तर २०१४ ते २०२४ अशी दहा वर्षे त्यांनी शिर्डी मतदार संघाचे खासदारपद भुषविले आहे. दोन्ही मतदार संघांत तरुण मतदार अधिक आहेत. ही तरूणांची मते उमेदवारांना विजयांचे गणित जुळविताना महत्त्वाचे ठरणार आहेत.
बंडाचा झेंडा
अहमदनगर लोकसभा मतदार संघात पक्ष अथवा आघाडी-युतीतून प्रत्यक्ष बंडाळीचा धोका कमी आहे. आमदार राम शिंदे यांची नाराजी बंडापर्यंत पोहोचण्याची शक्यता तुर्तास दिसत नाही. मात्र, शिर्डी मतदार संघात बंडाळीची शक्यता जास्त आहे. काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते या महाविकास आघाडीच्या उमेदवारा विरोधात बंड करण्याची तर भाजप व शिंदे गटाचे काही कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारा विरोधात बंड करण्याची शक्यता आहे. हे बंड उमेदवारीच्या रुपात उघड असेल की छुप्या पद्धतीचे असेल, ही बंडे मोडून काढण्यात महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार काय रणनीती आखतात यावर पुढील राजकारण ठरण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
विकासापेक्षा आरोप-प्रत्यारोपांवर भर
निवडणुकीच्या प्रचारांच्या तोफा आता धडाडू लागणार आहेत. तत्पूर्वी, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातून विकासाचा मुद्दा मागे पडत आहे. ही लोकशाही व मतदारांच्या भविष्यासाठी धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे. मतदारसंघाच्या विकासावर बोलणारा व त्या प्रमाणे कृती करू शकणारा उमेदवार ही लोकशाहीची गरज आहे. आरोप-प्रत्यारोपांची रंगपंचमी लवकरच संपून विकासाची गुढी हाती घेऊन उमेदवार मते मागण्यासाठी मतदार राजाच्या दारी जातील, अशी अपेक्षा आहे.