Maldhok Bird Sanctuary : कर्जत: खांडवी (ता.कर्जत) शिवारातील माळढोक पक्षी अभयारण्याच्या (Maldhok Bird Sanctuary) गट क्रमांक १८ च्या हद्दीत बेकायदेशीर शिकार (Hunting) करणाऱ्या सहा शिकाऱ्यांना वनविभागाने (Forest Department) मुद्देमालासह ताब्यात घेत अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची वनकोठडी देण्यात आली.
नक्की वाचा : भारताचा इंग्लंडवर थरारक विजय; कसोटी मालिका २-२ ने बरोबरीत
वनविभागास मिळाली गुप्त माहिती
रविवारी (ता.३) सकाळी साडेसात- आठच्या सुमारास कर्जत तालुक्यातील खांडवी गावाच्या हद्दीतील गट क्रमांक १८ मधील माळढोक पक्षी अभयारण्यात बेकायदेशीर शिकारीचा गंभीर प्रकार घडला असल्याची गुप्त माहिती वनविभागास मिळाली. सदरची घटना अत्यंत संवेदनशील आणि जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या संरक्षित क्षेत्रात घडल्यामुळे पुणे वन्यजीव विभागा अंतर्गत येणाऱ्या माळढोक पक्षी अभयारण्यतील वनपरिक्षेत्र मिरजगावचे वनअधिकारी व कर्मचाऱ्याना माहितीची योग्य शहानिशा करीत तातडीने कारवाई करण्याच्या सुचना उपवनसंरक्षक वन्यजीव विभाग पुण्याचे विवेक होशिंग, सहायक वनसंरक्षक अहिल्यानगरचे किशोर येळे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी मिरजगाव संकेत उगले यांना दिल्या.
अवश्य वाचा : पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध: विखे पाटील
पक्ष्यांची बेकायदेशीर शिकार (Maldhok Bird Sanctuary)
उगले यांनी तात्काळ आपले पथक घेत घटनास्थळ गाठले असता पथकास शेंद्रया विश्वनाथ काळे, सुरेश विश्वनाथ काळे, नितीन विश्वनाथ काळे, विजय कदम काळे, आयुर ईश्वर भोसले आणि गोरख दत्तु गांगर्डे या सहा जणांनी लाहुरी व तितर या पक्ष्यांची बेकायदेशीर शिकार करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. पक्ष्यांची बेकायदेशीर शिकार करण्यासाठी त्यांच्याकडे फासे, पक्ष्यांचे आवाज काढणारे स्पीकर व अन्य साहित्य घटनास्थळी आढळून आले. वरील सहा शिकाऱ्यांना मुद्देमालासह वनविभागाने ताब्यात घेतले. सदरची कारवाई परीक्षेत्रामधील वनरक्षक सागर वाकचौरे, अजिनाथ नन्नावरे, हरिभाऊ बारगजे, दिनकर लिलके व संरक्षण मजूर यांनी प्राथमिक तपासणीत ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने काढलेल्या व्हिडिओ वरून पार पाडली. याकामी रेहेकुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मारुती मुळे, वनपाल ए. सी. दळवी, वनरक्षक एम. बी. शिंदे, पी. एन. बिटके, यू. पी. खराडे, ए. आर. भोसले, पी. एस. उबाळे, एस. हिवराळे यांनी मोलाची भूमिका बजावली.