
Malhari Martand : संगमनेर : तालुक्यातील निमज येथील खंडोबा (Khandoba) मंदिरामध्ये मल्हारी मार्तंड (Malhari Martand) आणि म्हाळसाबाईच्या लग्नाची धूम पहायला मिळाली. गावात ढोल ताशांच्या गजरात देवाची मिरवणूक काढली. रात्री देवाची आरती करून लग्न लावण्यात आले. यावेळी तालुक्यातील हजारो भक्तांनी याठिकाणी हजेरी लावली.

नक्की वाचा : लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार की नाही?आदिती तटकरेंच महत्वाचं विधान
भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन
भाविक कुलपरंपरेनुसार जातात, पूजाअर्चा करून देवदर्शन घेतात, अनुष्ठाने करतात, हाती दिवटी-बुधली घेऊन आरती करतात, तळी भरतात, हळदीचा भंडारा व सुके खोबरे देवाचे नाव घेऊन उधळतात, देवाचा गोंधळ घालण्यासाठी जागर करतात, देवतेस अर्पण करण्यासाठी नैवेद्य करतात. पहिल्या दिवशी प्रवरा नदीवर मूर्ति मंगल स्नान व मिरवणूक, त्यानंतर घटस्थापना करून, मल्हारी महात्म्य पारायण व महाआरती, व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. नंतर जागर, काकडा, भजन, असं रोजचे कार्यक्रम आयोजन करून भाविक रमून जातात. चंपाषष्ठीच्या दिवशी मल्हारी महात्म्य पारायण सोहळा, मंगल स्नान, अभिषेक, मिरवणूक, व सायंकाळी ८:३० वाजता खंडोबा देवाचे लग्नसोहळ्याचा कार्यक्रमानंतर महाआरती आणि सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

आमदार अमोल खताळ सपत्नीक उपस्थित (Malhari Martand)
निमज गावातील तरुणांनी या लग्न सोहळ्यास बावीस वर्षांपूर्वी सुरुवात करून गावाला एकत्र आणण्याचे काम केले, पहिल्यांदा गावातील ग्रामस्थ कमी संख्येत एकत्र आले परंतु आज संपूर्ण गाव या सोहळ्यात हजेरी लावते. नुकतीच झालेली चंपाषष्ठी महोत्सवानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सलग सात दिवस हजारो लोक महाप्रसादचा लाभ घेतात. त्यानिमित्ताने सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन या लग्न समारंभ उत्साहात उपस्थित राहिले. या लग्न सोहळ्यासाठी तालुक्यातून विविध मान्यवर उपस्थित होते. संगमनेर विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी तसेच सामाजिक कार्यकर्ते राजन शिंदे, यांच्यासह गावातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, निमज गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.