
Mallikarjun Kharge on PM Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे अनेकदा त्यांच्या भाषणात स्वत:चा उल्लेख चहावाला (Tea Seller) असा करतात. लहान असताना आपण चहा विकल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Congress President Mallikarjun Kharge) यांनी काल (ता.२२) हा जुना मुद्दा उकरून काढत पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले (Targeted) आहे. त्यांनी केलेल्या टीकेवर भारतीय जनता पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यामुळे ‘चहावाला’ या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे.
नक्की वाचा: विद्यार्थ्यांनो ‘अपार आयडी’ काढले का ?,३१ जानेवारीपर्यंत अखेरची मुदत
नेमके काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे? (Mallikarjun Kharge on PM Modi)
काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (ता.२२) नवी दिल्ली येथे राष्ट्रीय मनरेगा कामगार परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना खरगे यांनी टीका केली. ‘मी चहावाला ही पंतप्रधान मोदी यांची मतांसाठी असलेली ड्रामेबाजी असल्याचे विधान खरगे यांनी केले. फक्त मतदान मिळविण्यासाठी मोदी आपण चहावाला असल्याचे सांगतात,पण खरोखरच त्यांनी आयुष्यात कधी चहा तयार केला आहे का ? मोदी यांनी कधी हातात किटली घेऊन रेल्वेच्या डब्यांमध्ये जाऊन विकला आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
अवश्य वाचा: अहिल्यानगरमध्ये महापौर पद ‘या’ प्रवर्गासाठी राखीव
भाजप सरकारवर टीकेची झोड (Mallikarjun Kharge on PM Modi)

केंद्र सरकारवर टीका करताना खरगे म्हणाले की,मोदी चहावाला असण्याचा बनाव फक्त मतदारांना आकर्षित करण्याचा भाग आहे. मोदी यांचे सर्व दावे म्हणजे केवळ नाटक आहे. केंद्र सरकारकडून गरिबांच्या प्रगतीपेक्षा निवडणुकीच्या प्रचाराला जास्त महत्त्व दिले जाते. सत्ताधाऱ्यांनी खरंच कष्ट घेतले असते, तर आज त्यांना देशातील कामगारांच्या वेदना समजल्या असत्या. कष्टकरी वर्गाच्या हितापेक्षा भाजपचा भर हा केवळ जाहिरात बाजीवरच राहिला आहे. यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षांनी केंद्र सरकारच्या पायाभूत सुविधांच्या विकासकामांवरही कडाडून टीका केली. वंदे भारत रेल्वेच्या अवतीभवती निर्माण करण्यात आलेल्या प्रचंड गाजावाजानंतरही रेल्वेचा मूळ विकास मात्र ठप्प झाल्याचा आरोप त्यांनी केला.
खरगे यांच्या विधानावर भाजपचा संताप (Mallikarjun Kharge on PM Modi)
मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी यांना उद्देशून केलेल्या विधानावर भारतीय जनता पक्षाने तीव्र संताप व्यक्त केला. काँग्रेसच्या अध्यक्षांचे हे विधान अहंकाराचे लक्षण असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली. पंतप्रधान मोदी हे कट्टर विचारसरणींपासून देशाचे संरक्षण करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सातत्याने वैयक्तिक हल्ले केले जात असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला. काँग्रेसचा अहंकार कधीच कमी होत नाही. राहुल गांधी यांच्या सूचनेवरून मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी यांनी कधी चहा बनवला आहे का, असे म्हणत पंतप्रधानांचा अपमान करण्यात आला आहे. त्यांच्यावर दररोज वैयक्तिक हल्ले करणे हीच काँग्रेसची भूमिका असल्याचे ते म्हणालेत.


