नगर : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सभागृहात मोबाईलवर ऑनलाइन रमी (Rummy) खेळतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यावरून विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. त्यातच आज माणिकराव कोकाटे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या दौऱ्याला राष्ट्रवादी शरद पवार गट (NCP Sharad Pawar Faction) आणि शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) तीव्र विरोध केला जात आहे. माणिकराव कोकाटे यांच्या ताफ्याला आज शिवसैनिकांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून शिवसैनिकांची धरपकड करण्यात आली आहे.
नक्की वाचा : राजस्थानमध्ये शाळेची इमारत कोसळली;४ जणांचा मृत्यू,८ गंभीर जखमी
राजकीय पोळी भाजण्यासाठी स्टंटबाजी (Manikrao Kokate)
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे धुळ्यात ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, त्या हॉटेल बाहेर सकाळपासूनच विरोधक जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करताना दिसून आले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे श्याम सनेर आणि माणिकराव कोकाटे यांच्या समर्थकांनी देखील हॉटेल बाहेर मोठी गर्दी केली होती. अजित पवार गटाकडून माणिकराव कोकाटे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण हॉटेल परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळाले. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या समर्थनार्थ आलेल्या समर्थकांनी विरोधक फक्त आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी स्टंटबाजी करीत असल्याचा आरोप केला आहे.
अवश्य वाचा : अखेर महायुतीचे ठरलं!महामंडळ वाटपासाठी ४४- ३३ -२३ चा फॉर्म्युला
शिवसैनिकांची पोलिसांकडून धरपकड (Manikrao Kokate)
माणिकराव कोकाटे आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना बाबळे फाट्याजवळ ठाकरे गटाकडून त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी माणिकराव कोकाटे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले. यानंतर पोलिसांनी शानाभाऊ सोनवणे यांच्यासह कार्यकर्त्यांची धरपकड केली. यामुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.