राहुरी: मराठा आरक्षण (Maratha Reservation) साठी तब्बल १६ दिवस उपोषण करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) सध्या राज्यभर सभा घेत आहेत. आपली भूमिका स्पष्ट करत पुढील आंदोलनाची ध्येय धोरणे ठरवत आहेत. रविवारी (ता.८) सकाळी ९ वाजता राहुरी येथे मनोज जरांगे यांची जाहीर सभा होत आहे, अशी माहिती मराठा (Maratha) एकीकरण समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षण मिळावे, यासाठी तब्बल १६ दिवस आमरण उपोषण केले होते. सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. ४० दिवसांत जर सरकारने आरक्षण संदर्भात ठोस पावले उचलली नाहीतर पुन्हा मोठा लढा उभारण्यात येईल, असा इशारा देखील त्यांनी दिला होता. सध्या राज्यातील विविध भागात ते सभा व गाठीभेटी घेत आहेत. राहुरी येथील विठ्ठल लॉन्स येथे मराठा एकीकरण समितीच्या सदस्यांची बैठक संपन्न झाली. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची सभा राहुरी येथे घेण्याचा एकमुखी निर्णय मराठा सदस्यांकडून घेण्यात आला.