नगर : उपमुख्यमंत्री जाणूनबुजून नेट बंद करतात. बीडमध्ये साखळी उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर (Maratha protestors) ३०७ चा गुन्हा दाखल केल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना निवांत झोप आली असेल. या सगळ्यामुळे उपमुख्यमंत्र्यांचा आमच्याशी दगाफटका करण्याचा डाव असू शकतो, असे लोकांना वाटत आहे. हा गंभीर आरोप वाटत असेल, पण मी हे थेट सांगत आहे. आम्ही उपमुख्यमंत्र्यांना भीत नाही. तुमचं करिअर बरबाद करायचं की चांगलं, हे मराठ्यांच्या हातात आहे, असा इशारा मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिला.
हे देखील वाचा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काड्या करायची सवय; मनाेज जरांगेंची नाव न घेता सडकून टीका
आज सकाळी अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी जरांगे पाटलांनी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी जरांगेनी आंदोलनाच्या आडून राजकीय वक्तव्य करु नयेत, असं म्हटलं आहे. तर नितेश राणेंनी मनोज जरांगेंचा बोलवता धनी कोण आहे, असा सवाल उपस्थित केला आहे. या प्रश्नावर जरांगे पाटील यांनी, “आता राणेंनी बोलू नये, अशी माझी इच्छा आहे. काल माझ्याशी फोन करुन गोडगोड बोलतात. पण आता याच्यापुढे बोलू नका,” असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा : मराठा आरक्षणासाठी अकोले तालुक्यात कडकडीत बंद
यानंतर पत्रकारांनी प्रसाद लाड यांनी तुमचा बोलवता धनी कोण आहे, असा प्रश्न विचारल्याचं पत्रकाराने सांगितलं. यावर संतापलेल्या स्वरात जरांगे पाटलांनी, “त्याला भेटल्यावर सांगतो बोलवता धनी कोण आहे आणि काय आहे,” असं उत्तर दिलं. जरांगे पाटील यांनी पोलीस आणि प्रशासनाकडून शांततेत आंदोलन करत असलेल्या आंदोलकांना उचलून नेलं जात आहे, असं म्हणत राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.
मराठा समाजातील तरुण शांततेत आंदोलन करत आहेत. मात्र, सरकार त्यांचेच लोक घुसवून हिंसाचार घडवून आणत असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे. मुंबईमध्ये होत असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीसंदर्भात बोलताना जरांगे पाटलांनी, दुसऱ्यांदा ही बैठक होत आहे. मात्र, आम्हाला पूर्णपणे आणि सरसकट सर्व मराठ्यांना आरक्षण मिळल्याशिवाय आम्ही आंदोलनावरुन उठणार नाही. सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी केली आहे. तसेच आज संध्याकळपर्यंत काही निर्णय झाला नाही, तर आपण पाणीही सोडणार असल्याचं जरांगेनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना म्हटलं आहे.