नगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) झटणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या सहा जूनपर्यंत आरक्षण द्या अन्यथा हे आंदोलन खूप मोठं होईल असं जरांगेंनी म्हटलं आहे. २१ ते २४ तारीख पर्यंत दौरा आहे त्यामुळे मी रुग्णालयातून सुट्टी घेतलेली आहे आणि चार जूनला आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला (Strike) सुरुवात होणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही, असा निर्धारही त्यांनी केला आहे.
नक्की वाचा : यंदाही मुलींनीच मारली बाजी;बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल!
मनोज जरांगे यांच्यावर मागच्या चार दिवसांपासून गाडखेडा परिसरातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते आंतरवली सराटीला गेले. त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
अवश्य वाचा : भारताच्या लेकीची गगन भरारी; पॅरा ॲथलेटिक्समध्ये पटकावले सुवर्णपदक
‘आम्हाला ६ जूनपर्यंत आरक्षण द्यावं, अन्यथा हे आंदोलन खूप मोठं होईल’ (Manoj Jarange)
यावेळी जरांगे म्हणाले की, आम्हाला लोकसभेच्या गुलालात पळायचं नसून आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गुलालात पडायचं आहे. तो गुलाल आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण आमची लेकरं मोठी झाली तर त्यांचं कल्याण होईल. त्यामुळे आमच्या न्यायासाठी आम्ही अंतरवालीत एकवटणार आहोत. मराठा आणि कुणबी एकच आहे, सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, हैदराबादचा गॅझेट लागू करावा ही आमची प्रमुख मागणी आहे. ठरल्याप्रमाणे आम्हाला ६ जूनपर्यंत आरक्षण द्यावं, अन्यथा हे आंदोलन खूप मोठं होईल,असा इशारा त्यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की, आम्हाला कोण पडले, कोण निवडून आले याचा आम्हाला आनंद नाही. आरक्षणाचा गुलाल आमच्यासाठी आमचा आनंद आहे. आम्हाला बाकी कशात आनंद नाही. जे कुणी मुद्दाम डिवचत आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. जातीय तेढ नेत्यांना निर्माण करायची आहे मराठा समाजाला नाही. नेते जातीवाद करायचा म्हणतात, कॅमेरासमोर गोड बोलतात. पण प्रत्यक्षात कृती काहीही होत नाही, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.