Maratha Reservation : मराठ्यांचं वादळ साेमवारी नगरमध्ये धडकणार; महाशांतता रॅलीची जय्यत तयारी, असे असेल नियोजन

Maratha Reservation : मराठ्यांचं वादळ साेमवारी नगरमध्ये धडकणार; महाशांतता रॅलीची जय्यत तयारी, असे असेल नियोजन 

0
Maratha Reservation

Maratha Reservation : नगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे (Manoj Jarange) हे मराठा आरक्षण शांतता रॅलीसाठी ऐतिहासिक नगरमध्ये साेमवारी (ता. १२)  येणार आहेत. माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्यास अभिवादन करून त्यांच्या पायी रॅलीला सुरुवात होणार आहे. ही रॅली माळीवाड्यातून निघून चितळे राेडमार्गे जाणार आहे. चाैपाटी कारंजा येथे जरांगे यांची तोफ धडाडणार आहे. या रॅलीची जय्यत तयारी जिल्हा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी केली असून रॅली मार्ग भगवामय करण्यात येणार आहे.

नक्की वाचा: मनिष सिसोदिया यांना’सर्वोच्च’न्यायालयाचा दिलासा;दिल्ली मद्यधोरण प्रकरणात जामीन मंजूर

जिल्हाभरातून मराठा बांधव येणार (Maratha Reservation)

शांतता रॅलीसाठी जिल्हाभरातून मराठा बांधव येणार असल्याने शहरात मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे शहर व परिसरातील शाळा व महाविद्यालयांना एक दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी पुणे शहरातून शांतता रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर पुणे येथून जरांगे पाटील सोमवारी (ता. १२) नगर जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत.  केडगाव येथे मराठा बांधवांतर्फे जरांगे पाटलांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून पायी रॅलीला सुरुवात होईल. दरम्यान, मराठा बांधवांकडून रॅलीबाबत जनजागृती करण्यात येत आहे. रॅलीत माेठ्या प्रमाणावर सहभागी हाेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील मराठा बांधव मोटरसायकल, ट्रॅक्टरने नगर शहरात येणार आहेत. त्यासाठी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.  पुणे रस्त्याने येणाऱ्यांसाठी दौंड रस्त्यावरील नेमाने इस्टेट येथे व्यवस्था करण्यात आली आहे. कर्जत-जामखेडवरून येणाऱ्यांसाठी मार्केटयार्ड येथे, तर पाथर्डी, शेवगाव, नेवासे, राहाता, राहुरी, श्रीरामपूर आदी ठिकाणावरून येणाऱ्यांसाठी कल्याण रस्त्यावरील फटाका मार्केट, गाडगीळ पटांगण, न्यू आर्ट्स काॅलेज मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.  

अवश्य वाचा : कांद्याच्या हमीभावाची मागणी; इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक

असा असेल रॅलीचा मार्ग (Maratha Reservation)

मनाेज जरांगे पाटलांचे साेमवारी केडगाव येथे आगमन हाेणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा येथून पायी रॅलीला सुरुवात हाेणार आहे. मार्केट यार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे. मार्केट यार्ड येथून माळीवाडा, पंचपीर चावडी, कापड बाजार, चितळे रोड, चौपाटी कारंजा येथे रॅलीचा समारोप हाेणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here