Maratha Reservation : नगर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य केले होते. शपथविधीच्या निमित्ताने दिल्लीत मी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आलो होतो. त्यावेळी आमची मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) चर्चा झाली. यावर लवकरच आम्ही तोडगा काढू, असे अजित पवार यांनी म्हटले होते. मराठा आंदाेलक मनाेज जरांगे पाटलांनी (Manaj Jarange Patil) अजित पवारांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.
नक्की वाचा : भारताचा पाकिस्तानवर सहा धावांनी दमदार विजय
मनाेज जरांगे म्हणाले
”आम्हाला राजकारण करायचं नाही. आमची लेकरं मोठी झाली पाहिजेत. यासाठी आम्ही जीवाची बाजी लावतोय. आम्ही दिलेल्या व्याख्येनुसार सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, आमच्या मागण्या पूर्ण कराव्या, यासाठीच आम्ही जीव जाळतोय, पण दिलं नाही, तर कुणालाही सोडणार नाही. मी एवढा विरोध मराठ्यांसाठी करतोय आम्हाला दुसरं काही अपेक्षित नाही. राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत दुटप्पीपणा करत आहे. आता यांची थोडी फजिती झाली आहे, विधानसभा निवडणुकीत आणखी जास्त फजिती होईल.” मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाला सगेसोयऱ्यांचे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी ८ जूनपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले होते. ते दररोज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महायुती सरकारला इशारे देत आहेत.
अवश्य वाचा : माेदींच्या तिसऱ्या टर्मची वाटचाल गाैरवशाली ठरणार; महसूलमंत्र्यांचा विश्वास
विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेविषयी नापसंती (Maratha Reservation)
काँग्रेस पक्षाचे जालना लोकसभेचे खासदार कल्याण काळे यांनी नुकतीच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. यावेळी जरांगे पाटील आणि त्यांच्यात चर्चा झाली. चर्चेदरम्यान जरांगे पाटील कल्याण काळे यांच्याजवळ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेविषयी नापसंती व्यक्त केली. एकीकडून गोरगरीब मराठ्यांची मतं घ्यायची आणि एकदा मतं घेतली की, मराठ्याच्या विरोधात बोलायचे. मग विधानसभेला सगळं उलटसुलट होईल. निवडणुकीला भोळ्याभाबड्या मराठ्यांचा फायदा घ्यायचा आणि निवडून आला की तुम्हाला मस्ती येते. मराठ्यांना आरक्षण देऊ देणार नाही, ही भाषा कोणाची आहे. आता तुम्ही निवडून आलात, पण विधानसभेला सगळ्यांना पाडून टाकू. एवढी ताकद गोरगरीब मराठ्यांमध्ये आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
मनोज जरांगेंची तब्येत खालावली
मनोज जरांगे यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली तेव्हा आपली तब्येत खालावली असल्याचे सांगितले. त्यांच्या डोळ्यांवर ग्लानी दिसत होते. पण मराठा बांधवांनी शेतीची कामं सोडून इकडे येऊ नये. आपल्यासाठी शेती महत्त्वाची आहे. त्यामुळे काम सोडून कोणीही अंतरवाली सराटीत येऊ नका. मी इथे लढायला खंबीर आहे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले.