नगर : आजपासून जिल्ह्यात मराठा कुणबी व कुणबी मराठा, कुणबी (Maratha Reservation) जातीचे पुरावे तपासणीची विशेष मोहीम युद्धपातळीवर सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector’s Office) आज ‘विशेष कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला.
हे देखील वाचा : भारतीय महिला हॉकी संघांची कमाल; एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुवर्णपदकाला गवसणी
मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोहीम राबविण्यात आली. त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यावर नाशिक विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा- कुणबी नोंदी शोधण्यासाठी ४ नोव्हेबर पासूनच विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘विशेष कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला आहे.
नक्की वाचा : बाईपण जपणारं ‘झिम्मा २’ मधील ‘मराठी पोरी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्ह्यात अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील कक्ष स्थापन करण्याचे आदेश जारी केला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी या कक्षाचे सदस्य सचिव असणार आहेत. तर सदस्य म्हणून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व सहायक आयुक्त (नगरपालिका प्रशासन) हे असणार आहेत. तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली कक्ष स्थापन करण्यात आला आहे. निवासी नायब तहसीलदार हे सदस्य सचिव असणार आहेत. सदस्य सचिव म्हणून गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी (नगरपालिका, नगरपंचायत) हे असणार आहेत.
तपासणी केलेली कागदपत्रे व नोंदी मिळालेली कागदपत्रे याची निर्दोष यादी तयार करण्यासाठी संपूर्ण नगर महसूल प्रशासन आजपासून कामाला लागले आहे. जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार आणि महसूल कर्मचारी युद्धपातळीवर काम करीत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी सालीमठ स्वतः बारकाईने या कामावर लक्ष ठेवणार आहेत.
तालुकास्तरावर विविध शासकीय विभागातील १९६७ पूर्वीच्या कागदपत्रांची पडताळणी तपासणी करावयाची आहे. त्यात कुणबी कागदपत्रे आढळल्यास त्यांचे स्कॅनिंग करून जतन करावे, तसेच तपासलेले कागदपत्र व आढळलेल्या नोंदी यांची माहिती दैनंदिन स्वरुपात जिल्हा समितीने प्राप्त करुन घ्याव्यात. जिल्हा समिती विभागीय समितीस तसेच जिल्ह्याचे संकेतस्थळावर अद्ययावत करणे गरजेचे आहे. सदस्यांनी तालुका कक्षास भेट देऊन चाललेल्या कामाची प्रगती तपासावी, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. उपरोक्त सर्व अभिलेख शोधणे करीत प्रशासकीय स्तरावरील अभिलेख शोधणेबाबत नियोजन करण्यात आलेले आहे. नागरिकांना त्यांच्या कडील १९६७ पूर्वीचे शासकीय पुरावे जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात तसेच तालुका स्तरावरील कक्षात दाखल करता येतील. नागरिकांनी त्यांच्याकडील १९६७ पूर्वीचे शासकीय पुरावे असणारे अभिलेख (मराठी व्यतिरिक्त इतर भाषेत असल्यास सक्षम भाषांतरकार यांच्याकडून भाषांतरित) जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात तसेच तालुका स्तरावरील कक्षात दाखल करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सालीमठ यांनी केले आहे.