Maratha Reservation : मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यात बंदची हाक 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे मराठा संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी राज्याच्या विविध भागात बंद पुकारला आहे.

0
Maratha Reservation
Maratha Reservation

जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण (Strike) करण्याची ही चौथी वेळ आहे. जरांगे यांचे हे उपोषण रविवारी (ता.११) पासून सुरु आहे. त्यांनी अन्न, पाणी घेण्यास नकार दिला आहे. तसेच कोणतेही वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांमध्ये मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे मराठा संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी राज्याच्या विविध भागात बंद पुकारला आहे.

नक्की वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रात एकही सभा होऊ देणार नाही; मराठे काय आहे हे १५ तारखेनंतर पाहा, मनोज जरांगेंचा इशारा

माहितीनुसार, मराठा संघटनांकडून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर आंदोलनं केली जात आहेत. याचाच भाग म्हणून मराठा समाजाने पुण्यातील देवाची आळंदी येथे बंदची हाक दिली. त्याला आळंदीकरांनी प्रतिसाद दिलाय. वारकऱ्यांची मांदियाळी असणारी अलंकापुरी आज ओस पडलेली आहे. तर सोलापूर, मनमाड, बीड, बारामती येथेही मराठा संघटनांनी पुकारलेल्या बंदचे पडसाद दिसत आहेत. या जिल्ह्यांमधील शहरी भागात बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर ग्रामीण भागात बंदला मिळणारा प्रतिसाद संमिश्र आहे.

अवश्य वाचा : नेते शेतकऱ्यांच्या दारात जाण्याऐवजी मोदींच्या दारात; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मराठा क्रांती मोर्चाकडून बारामतीत बंद (Maratha Reservation)

मराठा क्रांती मोर्चाकडून बारामती शहर व बारामती तालुक्यात बंद पाळण्यात आलाय. तसेच इंदापूर, दौंड,पुरंदरमध्ये देखील बंदला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आज उत्तर सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा समाज बांधवाकडून सोलापुरातील कोंडी गावात ही बंद पुकारला आहे. गावात सकाळपासून सर्व दुकाने बंद, केवळ दुध आणि अत्यावश्यक सेवा सुरु आहे. मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर शहरासह तालुक्यात देखील बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला

मनोज जरांगे यांच्यासाठी वैद्यकीय पथक (Maratha Reservation)

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती ढासळत असल्याने जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्याची विनंती केली. मात्र, जरांगे पाटील यांनी नकार दिला. सध्या अंतरवाली सराटी येथे वैद्यकीय तज्ज्ञांचे एक पथक हजर आहे. परंतु, मनोज जरांगे पाटील वैद्यकीय तपासणीकडून पाहणी किंवा उपचार करुन घेण्यास तयार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here