अकोले : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यातच त्यांची तब्येत खालावल्याने मराठा समाज (Maratha society) चांगलाच आक्रमक झाला आहे. सरकार आरक्षण देण्यासाठी वेळकाढूपणा करत असल्याने त्याचा निषेध करण्यासाठी आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने अकोले तालुक्यात बंदची हाक देण्यात आली होती. त्यास व्यावसायिकांसह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
हे देखील वाचा : नेत्यांच्या फोटोला जोडे मारुन फासले काळे
मराठा समाजाने आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने मोर्चे काढून आपल्या तीव्र भावना सरकारच्या लक्षात आणून दिल्या आहेत. तत्पूर्वी सरकारने दिलेले आरक्षण टिकले नाही. परिणामी मराठा समाजातील अस्वस्थता वाढत चालली आहे. समाजातील गरीब माणूस कठीण परिस्थितीचा सामना करीत आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यातच त्यांची तब्येत खालावल्याने मराठा समाज अधिकच संतप्त झाला आहे.
नक्की वाचा : आमदार अपात्रतेबाबत सुप्रीम काेर्टाचे कठाेर पाऊल; ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश
त्यावरुनच त्यांना पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू केले आहे. अकोले तालुक्यातील सकल मराठा समाजानेही सरकारचा निषेध करण्यासाठी आणि मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यास मुळा, प्रवरा व आढळा खोर्यासह शहरातील व्यावसायिकांसह नागरिकांनी बंद पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, अकोले तहसील कार्यालयाच्या बाहेरही मराठा बांधवांनी आमरण उपोषण सुरू केलेले आहे. तर अंबडमध्ये आरक्षणाला विरोध करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा पुतळा जाळला आहे. आरक्षण मागणीची धार दिवसेंदिवस तीव्र होत आहे.