Marathi : अकोले : जगातील (World) महत्त्वाच्या प्रगत भाषांमध्ये मराठी (Marathi) ही भाषा असून ती ज्ञान-विज्ञानाची भाषा बनवण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक (SeniorLiterary) प्रा. रंगनाथ पठारे यांनी केले.
‘घडणारी शाळा’ या पुस्तकाचे प्रकाशन
अकोलेतील अगस्ती महाविद्यालयाच्या के. बी. दादा देशमुख सभागृहात प्रयोगशील शिक्षक भाऊसाहेब कासार लिखित ‘घडणारी शाळा’ या पुस्तक प्रकाशन समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संगमनेर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. के. के. देशमुख होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ, माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर, अकोले महाविद्यालयाचे उपप्राचार्य अशोक दातीर, अर्थवेद पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बी. एम. महाले, लेखक भाऊसाहेब कासार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रा. पठारे म्हणाले (Marathi)
मराठीच्या वेगवेगळ्या छटा आहेत. तिचं कोणतं रूप शुद्ध आहे याबाबत संभ्रम असण्याचं कारण नाही. तर तिची सर्वच रूपे शुद्ध आहेत. पालकांनी आपल्या मुलांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण मातृभाषेतूनच करावे. इंग्रजी हा विषय म्हणून शिकणे गरजेचे वाटते. ग्रामीण भागातील मुलांची बोली, संस्कृती मराठीला अनुरूप असते. इंग्रजी माध्यमातून शिकताना त्याला दुसर्या संस्कृतीत शिरावे लागते हे अवघड असते म्हणून शिक्षण परिसरातील भाषेतच उपलब्ध असायला हवे. वाचन हा शिक्षकांच्या शिक्षणाचा भाग आहे. भाऊसाहेब कासार यांचे घडणारी शाळा हे पुस्तक शिक्षकांना स्वतःला समृद्ध करण्यासाठी महत्त्वाचं पुस्तक असल्याचे तसेच घडणारी शाळा ही घडवणारीही शाळा असल्याचे गौरवोदगार त्यांनी काढले.
प्रयोगशील शिक्षक, लेखक भाऊसाहेब कासार यांनी पुस्तक लेखनामागील इतिहास उलगडून सांगितला. पुस्तकाचे मुखपृष्ठकार मीनानाथ खराटे, जालिंदर पावसे यावेळी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या पुस्तक प्रकाशन समारंभासाठी शिक्षकांची लक्षणीय उपस्थिती होती. प्रास्ताविक दीपक पाचपुते यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सेवानिवृत्त शिक्षणविस्तार अधिकारी डी. डी. वाकचौरे यांनी करून दिला. सूत्रसंचालन अनिल कडलग यांनी केले तर ज्ञानदीप प्रतिष्ठानचे बाळासाहेब शेळके यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानदीप प्रतिष्ठानचे सतीष वैद्य, अनिल पवार, गणपत सहाणे, बाळासाहेब तोरमड, नामदेव सोंगाळ, दत्तात्रय शेळके, ज्ञानदेव फापाळे, सुनील शेळके, ललित छल्लारे, भाऊसाहेब हासे आदिंनी विशेष परिश्रम घेतले.