Marathi Drama | सामाजिक विषमतेवर ओरखडे ओढणारं ‘प्रियंका आणि दोन चोर’

0
Drama Priyanka aani Doan Chor
Drama Priyanka aani Doan Chor

Marathi Drama | नगर : माणसानं प्राप्त गोष्टींमध्ये समाधानी न राहता ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत, त्याची हुरहूर मनाला लावून घ्यावी का? आयुष्यात छोट्या गोष्टींच्या स्वप्नपूर्तीतून मिळालेला आनंद क्षणभंगुर ठरतो का? अशा प्रश्नांची उत्तरे शोधणारं आणि देशातील आर्थिक व सामाजिक विषमतेचा आरसा दाखवणारं ‘प्रियंका आणि दोन चोर’ हे नाटक (Drama) बुधवारी (ता.२७) रोजी राज्य नाट्य स्पर्धेत अहिल्यानगर केंद्रात पार पडलं.

नक्की वाचा : ‘देशात पेट्रोलऐवजी बायोइथेनॉलवर वाहने धावणार’-नितीन गडकरी

थोडक्यात कथानक (Drama)

श्याम मनोहर लिखित आणि कृष्णा वाळके दिग्दर्शित नगरच्या स्व. गिरिधारीलाल चौधरी अभिनव ग्राम प्रबोधिनीने सादर केलेल्या या नाटकाचा पडदा उघडताच चोरून आणलेल्या ट्रान्सिस्टरवर गाणं लावून टापटीप टाय बुटातला एक तरूण (कृष्णा वाळके) नाचत प्रवेशतो. थोड्याच वेळात तशीच वेशभूषा केलेला दुसरा चोर (प्रतीक अंदुरे) देखील प्रवेश करतो. या नाटकातील तिसरे पात्र प्रियंका (रेणुका ठोकळे) एका बांधकाम साईटवरच्या वॉचमनची बायको. अनेक श्रीमंतांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या प्रियंकाचं सगळ्यात मोठं स्वप्न म्हणजे आठवडाभराचं किराणा एकदाच भरून ठेवणं. संसाराला थोडीशी मदत म्हणून रात्रीच्यावेळी राहण्यासाठी ती बांधकामाच्या जागी बिल्डरच्या अपरोक्ष दोन तरुणांना आश्रय देते आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून पैसेही घेते. आश्रयाला आलेले हे दोन तरुण म्हणजे हाताला लागेल ते किरकोळ दागिने आणि वस्तू  चोरणारे चोर. आपण चोर वाटू नये, तसे दिसू नये म्हणून त्यांची राहणी मात्र टापटीप टाय व बुटातली. यापैकी एकजण आपल्याला घालायला सोन्याची चेन हवी, पण ती दोन दिवसातल्या चोरीत मिळाली नाही म्हणून निराश, तर दुसरा मिळालेल्या पैशातून एक दारूची बाटली व बिर्याणी आणून तिचा आस्वाद घेत सुखी होऊ पाहणारा. प्रियंकाला खूप प्रयत्नानंतर आठवड्याचा बाजार एकावेळी करायला मिळाला म्हणून मनापासून आनंद होतो. पण आनंद व्यक्त करण्यासाठी कोणी व्यक्ती नसल्यामुळे म्हणून प्रियंका पुन:पुन्हा या दोन चोरांच्या आसपास घुटमळत आपल्या पद्धतीनं आपला आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. हे करत असताना तिला आपण ज्या ज्या ठिकाणी काम केले तेथील बायकांचे किस्से बडबड करत सांगत राहते. दोन चोरांनाही आपले काही अनुभव एकमेकाला सांगावेसे वाटतात आणि यातून एकीकडे असलेल्या चीजवस्तूंची किंमत न ठेवणारा वर्ग आणि दुसरीकडे खाण्यापिण्याचेही दुर्भिक्ष्य असलेला गरीब वर्ग यामधील तफावत प्रेक्षकांपुढे उभी करण्यात दिग्दर्शक आणि कलाकार यशस्वी होतात.

अवश्य वाचा : जिल्ह्यात मंत्रिपदासाठी कोणाची लागणार वर्णी?

विनोदांना मिळाली दाद (Drama)

कृष्णा वाळके यांनी दिग्दर्शन व नाटकातील पात्र अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळल्या. देशातील सामाजिक स्थितीवर सांकेतिक ओरखाडे मारणाऱ्या दमदार संवादा पेक्षा प्रेक्षकांकडून वरवरच्या विनोदांना अधिक दाद मिळाली. हर्षद पगारे यांनी निर्माणाधीन बांधकाम साईटचे नेपथ्य मोजके पण उत्तमरित्या साकारले. प्रकाश योजना तुषार बोरूडे तर पार्श्वसंगीताची बाजू राकेश इंगवले यांनी संभाळली. काही प्रसंगांमध्ये प्रकाशयोजना अजून प्रभावी करता येऊ शकली असती. वेशभूषा भारत पवार यांनी तर रंगभूषा प्रेरणा मोहिते यांनी पाहिली.

संवेदनशील संहिता (Drama)

प्रियंकाच्या भूमिकेतील रेणुका ठोकळे यांनी आपली भूमिका सहजतेने निभावताना चांगलीच छाप पाडली. संवेदनशील संहिता सलग संवादांद्वारे मांडण्यासाठी कृष्णा वाळके व प्रतीक अंदुरे यांनी खूप कष्ट घेतल्याचे दिसून येते. या दोघांची केमिस्ट्री आणि प्रियंकाची त्यांना मिळालेली साथ यामुळे ‘जगण्यातला आनंद शोधणारे समाजघटक आणि त्यांच्याआड येणारी नियती’ यांचं वास्तव चित्र प्रेक्षकांसमोर उभं करण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरले असं म्हणता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here