‘Mhaske’ Foundation : काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनच्या (Kakasaheb Mhaske Memorial Medical Foundation) बोल्हेगाव फाटा (Bolhegaon) येथील शैक्षणिक संकुलात गुरुवारी (ता.१७) जागेबाबत सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेमुळे करण्यात आलेल्या कारवाईच्या घटनेमुळे विद्यार्थी, पालक आणि स्टाफमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या घटनेदरम्यान कॅम्पसमध्ये गोंधळ निर्माण होऊन चुकीच्या अफवा पसरल्या गेल्या.
विशेषत:विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मात्र,व्यवस्थापन याबाबत सकारात्मक दृष्टीने मार्ग काढत असून एकाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नसल्याची ग्वाही काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनच्या विश्वस्त डॉ.दिप्ती म्हस्के- ठाकरे यांनी दिली आहे.
नक्की वाचा : पूजा खेडकरला चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश
काकासाहेब म्हस्के शैक्षणिक संकुलाच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बैठक शनिवारी (ता.१९) नगरमध्ये पार पडली. यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर्किटेक्ट समीर ठाकरे, काकासाहेब म्हस्के होमिओपॅथी मेडिकल काॅलेजचे प्राचार्य डॉ.विवेक रेगे, उपप्राचार्य डॉ.पुनम गायकवाड, काकासाहेब म्हस्के फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.संदीप बडधे, पार्वतीबाई म्हस्के नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य अजित चवरदार, प्रा.डॉ.निलिमा भोज, प्रा.नितीन ठुबे यांच्यासह संस्थेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवश्य वाचा : शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनकडून धर्मवीरगडातील हत्तीमोट बारवेची स्वच्छता
‘विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही’ (‘Mhaske’ Foundation)
डॉ.म्हस्के-ठाकरे म्हणाल्या की, महाविद्यालयाच्या आवारात घडलेल्या घटनेबाबत तातडीने संबंधित विद्यापीठांना कल्पना दिली गेली असून त्यांनी परिस्थिती समजून घेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या दृष्टीने सहकार्याची भावना दर्शविली आहे.आगामी परीक्षांबाबत पर्यायी परीक्षा केंद्र विद्यापीठांनी उपलब्ध करुन दिल्याने परीक्षा व्यवस्थितपणे व ठरलेल्या वेळेत पार पडणार आहेत. तसेच निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत लवकरच सकारात्मक मार्ग काढुन विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाच्या दृष्टीने योग्य ती तरतूद विश्वस्त आणि प्रशासन करीत आहे. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत काळजी करु नये,आम्ही सक्षमपणे आणि समर्थपणे परिस्थिती हाताळत आहोत.
वास्तविक, दोन दिवसांनंतर आम्ही आमची भुमिका मांडली याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, मात्र फार्मसीच्या विद्यार्थ्यांच्या सोमवारपासून सुरु होणाऱ्या परीक्षांच्या दृष्टीने पर्यायी केंद्र उपलब्ध करुन प्राधान्याने यातून मार्ग काढण्यात आम्ही व्यस्त होतो, असे त्या म्हणाल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळेत आणि सुरळीतपणे पार पडल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.