Milk Producer : कोतूळ दूध आंदोलनाची ३३ व्या दिवशी यशस्वी सांगता

Milk Producer : कोतूळ दूध आंदोलनाची ३३ व्या दिवशी यशस्वी सांगता

0
Milk Producer

Milk Producer : अकोले: दुधाला प्रति लिटर 40 रुपये दर मिळावा व दूध दराचा (Milk Price) राज्यात कायदा (Law) करावा, या प्रमुख मागणीसाठी सलग ३३ दिवस सुरू असलेल्या कोतूळ (ता.अकोले) येथील धरणे आंदोलनाची आज यशस्वी सांगता करण्यात आली. राज्याचे दुग्ध उपायुक्त हेमंत गडवे व दुग्धविकास अधिकारी गिरीश सोनोने यांनी कोतूळ येथे येऊन आंदोलकांची (Milk Producer) भेट घेतली. आंदोलनातील विविध मागण्यांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

नक्की वाचा: भारताला मोठा धक्का!विनेश फोगट ऑलिम्पिकमधून अपात्र  

शेतकऱ्यांची होणारी लुटमार रोखणारा कायदा

शेतकऱ्यांना दुधाला किमान दर देणे बंधनकारक करणारा, वजन काटे व मिल्कोमीटर यांच्यामार्फत शेतकऱ्यांची होणारी लुटमार रोखणारा कायदा आंध्रप्रदेश सरकारने तयार केला असून त्याच धर्तीवर महाराष्ट्रात कायदा तयार करावा, यासाठीचा आग्रह आंदोलनात लावून धरण्यात आला होता. महाराष्ट्र सरकारने याबाबत कायद्याचे प्रारूप तयार केले असून कोतूळ दूध आंदोलनात महाराष्ट्रात होऊ घातलेल्या या कायद्याचा ड्राफ्ट आंदोलकांना सादर करण्यात आला आहे. आंदोलनाची ही मोठी उपलब्धी आहे.

अवश्य वाचा: निळवंडेच्या कालव्यातून दुष्काळग्रस्त भागाला तातडीने पाणी सोडा : आमदार थोरात

शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या शासन व प्रशासनाकडून मान्य (Milk Producer)

आंदोलनादरम्यान उच्चस्तरीय पातळीवर झालेली ही चर्चेची चौथी फेरी होती. यापूर्वी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत विधानभवनात चर्चेची एक फेरी झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी दुसरी बैठक झाली. कोतूळ ते संगमनेर प्रांत कार्यालय असे ५५ किलोमीटरची ३५० पेक्षा जास्त ट्रॅक्टरचा समावेश असलेली ट्रॅक्टर रॅली आंदोलकांच्यावतीने काढण्यात आली होती, या पार्श्वभूमीवर राज्याचे दुग्ध आयुक्त मोहोळ व विभागीय आयुक्त शिरपूरकर यांच्या उपस्थितीत संगमनेर प्रांत कार्यालय याठिकाणी तब्बल तीन तासाची सविस्तर चर्चेची तिसरी फेरी झाली होती. आज कोतुळ येथे चौथी फेरी झाली. या सर्व चर्चेच्या फेऱ्यांमध्ये शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या शासन व प्रशासनाने मान्य केल्या आहेत.


सरकारच्यावतीने दुधाला पाच रुपयाचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे. खासगी व सहकारी दूध संघाने ३० रुपये दूध उत्पादकांना द्यावे, असे बंधन या योजनेत टाकण्यात आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये येत असलेल्या विविध अडचणीची  सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.  ३.२ / ८.३ गुणवत्तेच्या आतील दुधाला एक रुपयाचा डिडक्शन रेट अनेक कंपन्यांनी लागू केला आहे. तो कमी करून ३० पैसे करावा, यासाठीचा आग्रह पुन्हा एकदा आंदोलकांनी लावून धरला. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये अनेक दूध संघ व कंपन्यांनी डिडक्शन रेट कमी करण्याबद्दल शब्द दिला असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.


नगर जिल्ह्यातील बहुतांशी खासगी व सहकारी दूध संघांनी दुधाला ३० रुपयाचा दर लागू केला आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील काही संघ अद्यापही हा दर लागू करायला तयार नाहीत, याबाबतच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या. अशा संघांवर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. पशुखाद्याचे दर कमी करावेत, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली भेसळ विरोधी कारवाई तीव्र करून ती महाराष्ट्रभर राबवावी व सातत्याने सुरू ठेवावी, वजन व मिल्कोमीटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होत असलेली लूटमार थांबवण्यासाठी मिल्कोमीटरचा समावेश केंद्राच्या वजन मापन तपासणी सुचित तातडीने करण्यात यावा, या मागण्यांबाबतही ठोस लेखी आश्वासन यावेळी आंदोलकांना देण्यात आले. दुधाला प्रतिलिटर ४० रुपयाचा भाव मिळावा यासाठी शालेय पोषण आहारामध्ये दूध व दुग्धपदार्थांचा समावेश करणे, २० लाख लिटर दुधाची सरकारने खरेदी करून त्याची पावडर बनवणे व अशी पावडर कुपोषण निर्मूलन व माता बाल संगोपनाच्या कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून गरजूंना वितरित करणे, आदी विविध पर्यायांवर यावेळी पुन्हा चर्चा करण्यात आली. याबाबत ठोस कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन शासन व प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना देण्यात आले.


कोतूळ दूध आंदोलन सलग ३३ दिवस चालले. राज्यात आजवर झालेल्या आंदोलनांमध्ये हे सर्वात प्रदीर्घ काळ चाललेले व्यापक आंदोलन होते. आंदोलनाची सबंध यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यासाठी कॉम्रेड सदाशिव साबळे यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. आंदोलनाच्या मंडपात यावेळी त्यांचा कोतूळ ग्रामस्थ व दूध उत्पादकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. ग्रामस्थ व ट्रॅक्टर रॅलीत सहभागी परिसरातील शेतकऱ्यांनाही यावेळी धन्यवाद देण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव साबळे, विनोद देशमुख, अभिजीत देशमुख, भाऊसाहेब देशमुख, बाळासाहेब गीते, अभी देशमुख, प्रकाश देशमुख, गौतम रोकडे, भारत गोर्डे आदींनी सहभाग घेतला. अमृतसागर दूध संघाचे अध्यक्ष वैभव पिचड, उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, आनंद वाकचौरे, अप्पासाहेब आवारी,  दादाभाऊ सावंत, संदीप चौधरी, संजय साबळे, प्रकाश साबळे, ज्ञानेश्वर काकड, राजू गंभीरे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here