Ministerial Post : नगर : विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात कोणाची मंत्रिपदी (Ministerial Post) वर्णी लागणार याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. यावर उमेदवारांसह कार्यकर्त्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ करत महायुतीने १० जागेवर दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे उमेदवारांना आता मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. त्यासाठी नूतन आमदारांनी मुंबई वाऱ्या सुरू केल्या आहेत.
नक्की वाचा : ‘खाशाबा’चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स
मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार
शिर्डी मतदारसंघात राधाकृष्ण विखे, नगर शहरातून आमदार संग्राम जगताप, शेवगाव- पाथर्डी मतदार संघातून आमदार मोनिका राजळे यांनी विजयाची हॅटट्रिक केली आहे. तसेच आमदार राजळे ह्या जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार आहेत. त्यामुळे त्याही मंत्रिपदाच्या रेसमध्ये असल्याची चर्चा आहे. तसेच नगर जिल्ह्यातून सर्वाधिक मताने विजय मिळविणारे कोपरगाव मतदार संघातील आशुतोष काळे यांनी ही मंत्रिपदासाठी दावेदार आहेत. तसेच राहुरी-नगर पाथर्डी मतदार संघाचे आमदार तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले हे ही मंत्रिपदाच्या रेस मध्ये आहेत. या पूर्वीही ते आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री होते. त्यांचा अनुभव पाहता त्यांना मंत्रिपद मिळू शकते. त्यामुळे मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपद मिळणार हे निश्चित मानले जात आहे.
अवश्य वाचा : ‘आमचं आम्ही बघू’,मुख्यमंत्रिपदाबाबत अजित पवारांचं वक्तव्य
जिल्ह्याचे राजकारण हे दिशा देणारे (Ministerial Post)
राज्याच्या राजकारणात जिल्ह्याचे राजकारण हे नक्कीच दिशा देणारे ठरले आहे. त्यात अहिल्यानगर जिल्हा हा सहकाराचा जिल्हा म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात किती मंत्रिपद खेचण्यात यश येते हे पाहावे लागणार आहे. विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे हे ही मंत्रिपदाचे दावेदार आहेत. त्यांचा महाविकास आघाडीचे रोहित पवार यांनी पराभव केला असला तरी देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक असल्याने त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वीही त्यांनी एकाच वेळी १२ खात्यांचा कार्यभार पाहिला होता. त्यांच्या अनुभवाचा विचार करता त्यांचा मंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो. अथवा त्यांना विधानपरिषदेचे अध्यक्षपद मिळू शकते. त्यामुळे त्यांची मंत्रीपदी वर्णी लागते की, नाही याकडे ही नागरकरांचे लक्ष लागले आहे.