Miss India International : श्रीरामपूर : दिल्ली (Delhi) येथे नुकत्याच पार पडलेल्या डिवाइन गृपने आयोजित केलेल्या मिस डीवाईन ब्यूटी २०२४ (Miss Divine Beauty 2024) सौंदर्य स्पर्धेच्या प्रतिष्ठित मिस इंडिया इंटरनॅशनल (Miss India International) स्पर्धेत श्रीरामपूरच्या रश्मी प्रेरणा राजीव शिंदे (Rashmi Shinde) हीने विजयाची पताका रोवली आहे.
श्रीरामपूर सारख्या तालुका पातळीवरील ठिकाणाहून येऊन आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत विजेतेपद मिळवणारी रश्मी शिंदे ही संपूर्ण भारतातील तालुकास्तरावरील पहिलीच तरुणी होय. या कामगिरीमुळे रश्मी शिंदे हिला जपानची राजधानी टोकियो या ठिकाणी होणाऱ्या ‘मिस इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे.
अवश्य वाचा: लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करुच नका; गोपीचंद पडळकरांची सुप्रिया सुळेंवर टीका
जगातील सर्वात जुनी व प्रतिष्ठित अशी सौंदर्य स्पर्धा
‘मिस इंटरनॅशनल’ ही जगातील सर्वात जुनी व प्रतिष्ठित अशी सौंदर्य स्पर्धा असून तिचे मुख्यालय टोकियो या ठिकाणी आहे. सौंदर्य व विलक्षण बुद्धिमत्तेच्या धनी असलेल्या रश्मी शिंदे हिच्या प्रतिनिधित्वामुळे प्रथमच या स्पर्धेच्या इतिहासात विजेतेपदाला गवसणी घालण्याची सुवर्णसंधी भारताला प्राप्त झाली आहे.
यापूर्वीही रश्मी हीने देशांतर्गत विविध सौंदर्य स्पर्धांमध्ये आपल्या कर्तुत्वाची अविट अशी छाप सोडली आहे. मग ते ‘इंडियाज मिस टिजीपीसी’ सारख्या सौंदर्य स्पर्धेत घवघवीत यश संपादन करणे असो किंवा व्हीजेटीआय मुंबईच्या इंजिनिअरिंग महाविद्यालयातील ‘प्रतिबिंब’ आणि ‘वस्त्र’ सारख्या लोकप्रिय फॅशन शोमध्ये सर्वांची वाहवा मिळवणे असो. रश्मी हे नाव मॉडलिंगच्या दुनियेत गेल्या चार ते पाच वर्षापासून सतत चर्चेत राहिले आहे.
नक्की वाचा: ‘जो हिंदू हित की बात करेगा,वही देश पर राज करेगा’;’धर्मवीर-२’चा नवा ट्रेलर प्रदर्शित
साहित्य, संगीत, कला, खेळ या क्षेत्रातही तिचा वावर (Miss India International)
रश्मी हीचा शैक्षणिक प्रवास देखील अतिशय उल्लेखनीय राहिला असून तिने आपले प्राथमिक शिक्षण श्रीरामपूर येथील सेंट झेवियर्स या शाळेतून तर माध्यमिक शिक्षण पुण्यातील नामांकित अशा बिशप स्कूलमधून पूर्ण केले आहे. शिक्षण चालू असतानाच साहित्य, संगीत, कला, खेळ या विविध क्षेत्रातही तिचा मुक्त वावर राहिला आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी स्व. ॲड. रावसाहेब शिंदे यांच्या रूपात एक ज्ञान तपस्वीच आजोबांच्या रूपात प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या संस्कारांचे, ज्ञानाचे, समाजसेवेचे, साहित्य तसेच वक्तृत्वाचे बाळकडू रश्मी हीस बालवयातच संस्कार रूपाने मिळाले.
त्यातूनच तिच्या व्यक्तिमत्त्वाचा बहुआयामी विकास होत राहिला. परिणामी रश्मी आज आघाडीची राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू तसेच राष्ट्रीय स्केटर खेळाडू म्हणूनही ओळखली जाते. एक परिपूर्ण ॲथलेटीक म्हणूनही तिच्याकडे आज पाहिले जात असून विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेऊन चमकदार कामगिरी करत तिने आपल्या शारीरिक क्षमतेची आणि कणखरपणाची चुणूक वारंवार दाखवून दिली आहे.
एवढेच नव्हे तर कथ्थक सारख्या शास्त्रीय नृत्याचे विधिवत प्रशिक्षण घेऊन तिने त्यातही नैपुण्य प्राप्त केले आहे. रश्मी हीचे मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषा वरती कमालीचे प्रभुत्व असून त्यातून अमोघ वक्तृत्वाचे कौशल्य तिने प्राप्त केले आहे. व्हीजेटीआय मुंबई सारख्या नामांकित महाविद्यालयातून तिने बी टेकची पदवी उत्तम गुण मिळवून प्राप्त केली आहे.