MNS : अहिल्यानगर : मराठीच्या मुद्यावरून बँकांविरोधात मनसेने (MNS) आंदोलन सुरु केले आहे. मराठी आलेच पाहिजे व मराठीतच बँकांचे कामकाज झाले पाहिजे असा आग्रह मनसैनिक करत आहेत. त्यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मनसेविरोधात सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. उत्तर भारतीयांविरोधात राज ठाकरे तिरस्कार पसरवत असून त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. उत्तर भारतीय विकाससेना (Uttar Bhartiya Vikas Sena) नामक पक्षाच्या सुनील शुक्लानी (Sunil Shukla) ही याचिका दाखल केली आहे.
अवश्य वाचा : मोठी बातमी!लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर मिळणार
राज ठाकरे हिंसेला पाठिंबा देत असल्याचा आरोप
उत्तर भारतीयांविरोधात राज ठाकरे हिंसेला पाठिंबा देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज ठाकरेंविरोधात तक्रार दाखल करून पक्षाची मान्यता रद्द करा. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात राज्य सरकारला तसे आदेस द्यावेत अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. सुनील शुक्ला मुंबईचेच रहिवासी असून त्यांच्या पक्षाच्या कार्यालयावर गेल्या वर्षी मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे.
नक्की वाचा : ‘कोणतही डिपॉझिट घेऊ नका’;पुणे महानगरपालिकेची खासगी रुग्णालयांना नोटीस
मराठी भाषा विरुद्ध हिंदी भाषा वाद (MNS)
राज्यभरासह मुंबईत मराठी विरुद्ध हिंदी असा वाद वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठी न बोलता हिंदी बोलण्याची सक्ती काहींजणांकडून केली जात आहे. तसेच मराठी व्यक्तीला नोकऱ्यांमधून डावलण्यात येत आहे. या सगळ्यांविरोधात मनसेने कडक भूमिका घेतली आहे. गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणामध्येही राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरून इशारा दिला होता. त्यानंतर मनसैनिक अनेक बँकांमध्ये जाऊन मराठीचा आग्रह करत आहेत. यावेळी विरोध करणाऱ्यांना मनसे स्टाईलने उत्तर दिले जात आहे.
यामुळेच सुनील शुक्ला यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, मनसे कार्यकर्त्यांनी आपल्याला धमकी दिल्याची तक्रार सुनील शुक्ला यांनी पोलिसात केली आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून फोन करून आणि सोशल मीडियावरून धमक्या दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.